पुन्हा एकदा “आयाराम-गयाराम…’ (अग्रलेख)

“महाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. पालकांनी विशेषतः कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी,’ असे जे ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे, ते विद्यमान राजकारणावर नेमके भाष्य करणारे आहे. नगरमधील कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर उपरोधिक टीका करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे, “कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपली मुले सांभाळता येत नसतील तर त्यात आमचा काय दोष?’ असा सवाल भाजपने आव्हाड यांना केला आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता आगामी काळातील राजकारण कसे असेल याची चुणूक यानिमित्ताने पाहायला मिळाली आहे. कारण निवडणूक म्हटली की, आयाराम आणि गयाराम यांचे राजकारण अपरिहार्यच मानावे लागते आणि नेहमीप्रमाणे इतर राजकीय पक्षांमधील नेत्यांना आपल्याकडे ओढण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. वर्ष 2014 च्या निवडणुकीवेळी हेच झाले होते आणि यावेळीही तसेच होत आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेससाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने न सोडल्यामुळे नाराज झालेल्या सुजय विखे-पाटील यांनी अखेर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला, हे त्याचे ताजे उदाहरण आहे.

अर्थात, कॉंग्रेससाठी हा निश्‍चितच मोठा धक्‍का आहे. आपल्या विद्यमान खासदाराला बाजूला सारून भाजपने सुजय विखे-पाटील यांच्यासाठी पायघड्या घातल्या, हे महत्त्वाचे आहे. गेल्याच आठवड्यात सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते, माजी आमदार व किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन प्रतापराव भोसले यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे सातारा जिल्ह्यातही कॉंग्रेसलाही मोठा धक्‍का बसला आहे. कॉंग्रेसच्या संस्कृतीत आणि पठडीत वाढलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याची भाजपची ही रणनीती, विरोधकांचे विशेषत: कॉंग्रेसचे मानसिक खच्चीकरण करणारी ठरणार आहे. सुजय विखे-पाटील यांचे वडील विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. तर वाईचे माजी आमदार असलेले मदन भोसले यांचे वडील प्रतापराव भोसले हे कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.

निष्ठावंत गटाचे कट्टर कॉंग्रेस नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. सातारा मतदारसंघातून प्रतापराव लोकसभेवर निवडून गेले होते. दिल्लीतील कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशीही त्यांचे उत्तम संबंध होते. या कारणामुळेच मदन भोसले किमान भाजपमध्ये जाणार नाहीत अशा पैजाही लावल्या जात होत्या. मात्र, तरीही त्यांनी कॉंग्रेसची साथ सोडली आणि भाजपची रणनीती यशस्वी झाली. केवळ महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यातही भाजपची हीच रणनीती सुरू आहे.विशेषत: पश्‍चिम बंगालमध्ये मुसंडी मारण्याचा भाजपचा प्रयत्न असताना भाजपच्या तंबूत तृणमूल कॉंग्रेसच्या एका विद्यमान खासदाराने तसेच कॉंग्रेस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रत्येकी एका आमदाराने प्रवेश केला आहे. कॉंग्रेसचे दिवंगत नेते प्रियरंजन दासमुन्शी यांच्या पत्नी आणि माजी खासदार दीपा यांनाही भाजप प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यापूर्वी तृणमूलचे नेते मुकुल रॉय यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारच्या राजकीय हालचाली निश्‍चितच परिणाम करणाऱ्या ठरतात. इतर राज्यात होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी भाजपने पश्‍चिम बंगालसारख्या राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे हे उघड आहे. त्याचा थोडाफार तरी फायदा भाजपला होणार आहे. अर्थात आयाराम संस्कृतीला प्रोत्साहन देताना आणि इतर पक्षातील नेत्यांसाठी पायघड्या घालताना, भाजपला अनेक ठिकाणी नाराजीचा सामनाही करावा लागणार आहे. उदाहरणार्थ, सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विद्यमान खासदार दिलीप गांधी नाराज झाले आहेत. दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी विरोध केल्यावरही सुजय विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. “खासदार दिलीप गांधी यांना उत्कृष्ट संसद पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांचे खासदार म्हणून काम चांगले असतानाही त्यांना डावलून अन्याय केला आहे’, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.

दिलीप गांधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही त्यांना नगर दक्षिणमधून उमेदवारी द्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. ही नाराजी प्रातिनिधिक मानावी लागेल. कारण इतर पक्षांमध्येही तीच स्थिती आहे. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तेथील स्थानिक शिवसैनिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. भाजपमधील काही नेते कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने कॉंग्रेस कार्यकर्तेही नाराज आहेत. निवडणुकीच्या राजकारणात असे पक्षबदलाचे वारे जेव्हा वाहू लागतात, तेव्हा त्या वाऱ्याचा पहिला फटका पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यानाच बसतो. पक्षाने काही राजकीय समीकरणे मांडून इतर पक्षातील नेत्यांसाठी पायघड्या घातलेल्या असतात. आतापर्यंत ज्यांच्या विरोधात प्रचार केला त्यांच्याच बाजूने घोषणा देण्याची वेळ या निष्ठावान कार्यकर्त्यावर येते.

“आम्ही फक्‍त सतरंज्या उचलायच्या का’ असा उद्विग्न सवालही केला जातो.पण पक्षाकडे अशा प्रश्‍नांना उत्तर नसते. आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवणे म्हणजेच इतर पक्षांचा प्रभाव कमी करणे या साध्या सोप्या समीकरणातून राजकीय पक्ष आयाराम गयाराम संस्कृतीला प्रोत्साहन देतात. ते समीकरण सर्वसामान्य कार्यकर्त्याना पटत नसले तरी स्वीकारावे लागते. कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्‍न सर्वसामान्य कार्यकर्त्याना नेहमीच पडतो. पण अखेर त्यांना पटत नसतानही पक्षाचा झेंडा उचलून घेऊनच कामाला लागावे लागते. त्यामुळेच आता येत्या काळात मोठे नेते आपले पक्षीय झेंडे आणि निष्ठा बदलत असताना त्यांच्या कार्यकर्त्याना तोच झेंडा खांद्यावर घेऊन अपरिहार्यपणे वाटचाल करावी लागणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)