रस्त्यावर, गोंगाटातील वाढदिवस नको रे बाबा!

विधायक उपक्रमाची जोड हवी; आनंद सोहळ्याचे हिडीस रूप टाळण्याचे आवाहन
संतोष कणसे

शाहूपुरी  – आपल्या आयुष्यातील वाढत्या वर्षाचा एक दिवस आनंदात साजरा करणं कोणाला आवडत नाही, आपल्याबद्दल व्यक्त होणारी प्रेमाची, आपुलकीची भावना वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करण्यासाठीचा तो एक आनंद सोहळा कसा साजरा करतो त्याबाबत मात्र आज विचार करणे गरजेचे बनले आहे. याचे कारण सातारा शहरात विविध चौकांमध्ये वाढदिवस रस्त्यावर साजरे केले, म्हणून पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. गोंगाट व इतरांना त्रास होईल, असा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा विधायक उपक्रमाने आपल्या वाढत्या वयाचे दर्शन इतरांना करून देण्याची ही संधी मनायला हवी, असे मत युवावर्गातून व्यक्त होऊ लागले आहे.
वाढदिवसाच्या सोहळ्याचे होत असलेले हिडीस दर्शन.

वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती या सोहळ्याचे महत्व कमी करू पाहत आहेत की काय असे वाटू लागले आहे. विविध चौकांमध्ये रस्त्यारस्त्यावरती वाहतुकीला अडथळा करून, गाडी आडवी लावून, हातामध्ये धारधार तलवारी घेऊन, मोठमोठ्या आवाजात आरडाओरडा करत केक कापताना काही युवकांच्या गटांना धन्यता वाटते. हा केक सर्वांनी वाटून खाण्यापेक्षा अंगाला, चेहऱ्याला फासणं ही हिडीस पद्धत अवलंबली जाऊ लागली आहे. यापेक्षा अजून भारी म्हणजे रात्री बारा वाजता फटाक्‍यांची आतषबाजी करून सर्वाना झोपेतून जागे करायचे. वाढदिवसानिमित्त रात्री अपरात्री फटाके वाजवण्याची प्रथा जपली जाते, ती परिसरातील लोकांच्या आरोग्याला त्रास देणारी आहे, याचे भानही उरलेले नाही. महाविद्यालय परिसरात याचे लोन मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे.

याला खतपाणी मिळते शहरात लागणाऱ्या वाढदिवसाच्या बॅनरमधून. कर्तृत्वशून्य व्यक्तींच्या अशा बॅनरमुळे महत्त्वाच्या व्यक्तींचे महत्त्व कमी होते, हेही लक्षात घेतले जात नाही. बॅनरवरच्या मंडळींना गल्लीतही ओळखत नसतात. मात्र त्यांचे फोटो विविध स्टाईल, मजकूर, संदेशासह पाहयला मिळतात. अशा या प्रथांना फाटा द्यायला हवा, यासाठी काही युवकही पुढाकार घेऊ लागले आहेत. आनंदोत्सव ठीक आहे. मित्र किंवा आप्तेष्टाच्या प्रेमापोटी हे सर्व करतो. पण त्यामुळे कोणाला त्रास होतोय का, याचा विचार करणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. वाढदिवसाचे सोहळे हे आनंद देणारे व आनंद वाटणारे असावेत. समाजातील इतरांना उपद्रव करणारे नसावेत.

सोशल मीडियावरील शुभेच्छांच्या आभासी पावसात भिजण्याचा आनंद क्षणिक असला तरी तो मनाला मोहरून टाकतो. तरीदेखील प्रत्यक्ष भेटण्याची मजा काही औरच असते. यापुढे वाढदिवस विधायक पद्धतीने साजरा करूयात, मोठ्या आवाजाच्या गोंगाटापेक्षा आपुलकीच्या प्रेमाच्या एका भेटीतून एखादे झाड लावून किंवा कुणाला मदत करून वाढदिवस झाला तर त्याचा आनंद अवर्णनीयच असतो, हे समजण्याची गरज आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)