पिंपरी – पिंपळे गुरव येथे पवना नदीपात्रात बुडालेल्या तरुणाचा सलग चौथ्या दिवशीही शोध लागू शकला नाही. नदीपात्रात सांगवी स्मशानभूमी ते हॅरिस ब्रिज दरम्यान शुक्रवारी दिवसभर अग्निशामक दलाच्या वतीने शोध मोहीम राबविण्यात आली. ड्रोन कॅमेरा, ऍम्फीबियन पोकलेन सारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर करुनही सलग चौथ्या दिवशी अग्निशामक दलाला शोधमोहिमेत अपयश आले.
पिंपळे गुरव येथील घाटावरून मंगळवारी (दि. 9) दुपारी साडेचारच्या सुमारास शुभम येडे (वय – 23, रा. रहाटणी) या तरुणाने पवना नदीपात्रात उडी मारली होती. महापालिका अग्निशामक दलाकडून त्याचा गेल्या तीन दिवसांपासून शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी अंडर वॉटर सर्च कॅमेरा, ड्रोन कॅमेरा आदींचा वापर करण्यात आला. तर, आज चौथ्या दिवशी दापोडी स्मशानभूमीजवळ नदीपात्रामध्ये पाण्यावर तरंगणारे ऍम्फीबियन पोकलेन उतरविण्यात आले. येथील जलपर्णी बाजूला सारत संबंधित तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला. ठेकेदाराने न काढलेली जलपर्णी शोधकार्यात मुख्य अडथळा ठरत असल्याचे समोर आले.
पावसाळा सुरू झाल्यानंतरही नदीपात्र जलपर्णीने व्यापले आहे. अग्निशामक दलाचे जवान जलपर्णी बाजूला सारुन शोध घेत होते. मात्र, आजही चार दिवसांपूर्वी बुडालेला तरुण सापडू शकला नाही. मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल घटनास्थळी हजर होते.