नगर जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तीन कोटी 76 लाख जप्त – राहुल द्विवेदी

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

नगर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या 36 पथकांकडून तीन कोटी 76 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्याची प्राप्तिकर विभागाकडून तपासणी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक ईशू सिंधू उपस्थित होते. नगर लोकसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने नागरिकांच्या सुविधेसाठी व तक्रार निवारणासाठी विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिले आहेत. याद्वारे जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त तक्रारीचा तत्काळ निपटारा करण्यात आला.

मतदारसंघात एकूण 2 हजार 30 मतदान केंद्र आहेत. 2030 मतदान केंद्रांवर मतदानासाठी आवश्‍यक त्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिव्यांग मतदारांसाठी वाहन व्यवस्था व मतदान केंद्रांवर अस्थिव्यंग व वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. 152 मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली असून, 192 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर 8 हजार 932 अधिकारी कर्मचारी व 198 क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्‍ती करण्यात आली असून, सर्वांना आवश्‍यक प्रशिक्षण, ईव्हीएम प्रत्यक्ष हाताळणीबाबत प्रशिक्षण देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले.


8 हजार 932 अधिकारी, कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त

जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांत 18 लाख 54 हजार 248 मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार आहेत. यात 9 लाख 70 हजार 631 पुरुष व 8 लाख 83 हजार 529 महिला मतदारांचा समावेश आहे. 8 हजार 932 अधिकारी, कर्मचारी या निवडणुकीसाठी कार्यरत असून, त्यांचे आवश्‍यक प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)