तळेगाव दाभाडे –अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद व श्रीरंग कलानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 21) गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये तळेगाव दाभाडेचे गानतपस्वी कै. पं. शरदराव जोशी यांच्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीवर “मागोवा स्वर पर्वाचा’ हा कार्यक्रम होणार आहे.
श्रीरंग कलानिकेतन सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाची संकल्पना तळेगाव दाभाडेच्या संगीत अभ्यासक संपदा थिटे आणि नृत्य अभ्यासिका मीनल कुलकर्णी यांची आहे. शरदराव जोशी यांच्या संगीत रचना, त्यांनी लिहिलेल्या नाटकातील काही प्रवेश, त्यांनी साकारलेल्या संगीत नाटकातील भूमिका, त्यांनी स्वरबद्ध केलेली बालगीते, भजन, नाट्यगीते यांचा मागोवा घेण्यात येणार असून, यात 40 हून अधिक कलाकारांचा सहभाग असेल, अशी माहिती श्रीरंग कलानिकेतनच्या अध्यक्षा डॉ. नेहा कुलकर्णी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी दिली.