विविध: ओम प्रकाश

माधव विद्वांस

हिंदी सिनेमातील चरित्र अभिनेते ओम प्रकाश यांचे आज पुण्यस्मरण (निधन 21 फेब्रुवारी 1998) त्यांचा जन्म जम्मू येथे 19 डिसेंबर 1919 रोजी झाला. वर्ष 2019 हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचे संपूर्ण नाव ओम प्रकाश छिब्बर असे होते. ते चित्रपटसृष्टीत ‘ओमप्रकाश’ नावानेच प्रसिद्ध झाले होते. त्यांना लहानपणापासून संगीताची आवड होती ते शास्त्रीय संगीतही शिकले होते. जम्मूच्या एका नाटक मंडळीत ते सुरुवातीला काम करायचे.

दुसऱ्या महायुद्धाचे वेळी रावळपिंडीहून लाहोरला जाताना चुकून पहिल्या दर्जाच्या डब्ब्यात शिरले पण त्यांनी स्वतः मुके असल्याचा अभिनय करून सहानुभूती मिळवली व प्रवास पूर्ण केला हा त्यांचा पहिला अभिनय. वर्ष 1937 मध्ये ते रुपये 25/-पगारावर ऑल इंडिया रेडिओमध्ये निवेदक म्हणून हजर झाले. त्यांना फतेह दीन म्हणून ओळखले जायचे. एका लग्नसमारंभात ते लोकांचे स्वागत करीत असताना सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता दुलुख पंचोली यांनी त्यांना पाहिले व ही व्यक्‍ती आपल्या उपयोगाची आहे, असे वाटले आणि त्यांना त्यांचे लाहोर कार्यालयात भेटण्यास सांगितले. फिल्म ‘दासी’मध्ये पंचोली यांनी त्यांना पहिल्यांदा संधी दिली. या वेळी त्यांना 80 रुपये मेहेनताना देण्यात आला होता. मात्र या चित्रपटामुळे त्यांना त्यांच्या उपजीविकेचे साधन मिळाले. ‘श्रीयुत शरीफ बदमाश’ या मूक फिल्ममध्ये त्यांना चांगली भूमिका मिळाली.

ओम प्रकाश हे विनोदी भूमिकेसाठी लवकरच प्रसिद्ध पावले, तसेच भावुक प्रसंगातही ते उत्कृष्ट अभिनय करायचे. हिंदुस्थानचे विभाजनानंतर लवकरच ते दिल्ली येथे आले आणि मग मुंबई येथे आले. त्यांच्यामधली प्रतिभा बलदेवराज चोप्रा यांच्या लक्षात आली. ओमप्रकाश यांना त्यांनी अभिनय करिअर पुढे चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले. सुरुवातीला संघर्ष करावा लागला. बहुमुखी अभिनेता म्हणून सिद्ध करण्याची त्यांच्याकडे क्षमता होती याची चोप्रा यांना खात्री होती. सुरुवातीला ‘लखपती’ या चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली. त्यानंतर ‘चार दिन’ आणि “रात की रानी’ यासारखे चित्रपट त्यांनी गाजवले.

ओमप्रकाश यांनी स्वतःची अशी एक शैली निर्माण केली. त्यांनी 350 चे वर चित्रपटात कामे केली. दिलीपकुमार यांचेबरोबर ‘गोपी’ या चित्रपटातील त्यांची भूमिका अभिनयाचे दृष्टीने उत्कृष्ट मानली जाते. त्यांच्याबद्दल दिलीपकुमार एकदा म्हणाले होते की, माझ्या अभिनय कारकिर्दीत मी फक्त एकदाच घाबरलो होतो ते म्हणजे ‘गोपी’ चित्रपटाच्या वेळी ओमप्रकाशजीच्या कामगिरीमुळे मी फिका पडतो की काय असे मला वाटले होते.’

ओमप्रकाश यांनी जेवढे चित्रपट केले त्यावर त्यांच्या अभिनयाची मोहोर त्यांनी उठविली होती.विनोदी आणि भावुक अशा दोन्ही दृश्‍यातील भूमिका संस्मरणीय ठरल्या आहेत. वर्ष 1944 मध्ये दासी’ या चित्रपटापासून सुरू झालेला अभिनयाचा प्रवास ‘घर की इज्जत ‘हा 1994 मधील अखेरच्या चित्रपटानंतर थांबला. 21 फेब्रुवारी 1998 रोजी लीलावती हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)