लोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड

सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केले निवडीचे स्वागत
नवी दिल्ली: लोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. त्याच्या या पदासाठीच्या नावाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाचे नेते या नात्याने मांडला. त्या प्रस्तावाला आवाजी मतदानाने सर्वांनी पाठिंबा दिला. या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी अनुमोदन दिले. अशाच आशयाचा दुसरा प्रस्ताव अमित शहा यांनी मांडला त्याला नितीन गडकरी यांनी पाठिंबा दिला.

कॉंग्रेस आणि द्रमुक या पक्षांनीही त्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला पण त्यासाठीची मुदत संपल्यामुळे विशेष केस म्हणून हंगामी सभापतींनी त्या दोन पक्षांना बिर्ला यांच्या नावाचा पुरस्कार करणारे प्रस्ताव मांडू देण्यात आले. त्यांच्या निवडीची औपचारीक घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह सभागृहातील अन्य ज्येष्ठ सदस्यांनी त्यांना सभापतीपदाच्या आसनापर्यंत सन्मानाने नेले. त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाची भाषणे झाली. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना सांगितले की बिर्ला यांनी विद्यार्थी दशेपासून संघटनेचे काम केले आहे.

राजकारणातील लोकप्रतिनिधी म्हणून ते जितके लोकप्रिय आहेत तितकेच सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. गरीबांना अन्न आणि कपडे पुरवण्यापासून या वर्गातील मुलांना शैक्षणिक मदत देण्यापर्यंतचे मोलाचे कार्य त्यांनी आवडीने केले आहे. गुजरातमधील भुकंपग्रस्तांनाही मदत करण्यासाठी ते राजस्थानातून मदत सामग्री घेऊन गुजरातेत आले होते अशी आठवणही त्यांनी नमूद केले. त्यांचा स्वभाव अत्यंत विनम्र व दयाळू आहे. त्यांच्या या स्वभावाचा विरोधकांकडून गैरफायदाही घेतला जाण्याची शक्‍यता वाटते अशी नर्मविनोदी टिपणीही मोदींनी केली. कॉंग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी यांनीही त्यांच्या निवडीचे स्वागत करताना ते विरोधकांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे चालवले जावे असे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित असून ते आमची अपेक्षा पुर्ण करतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here