मधमाशांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, 24 जखमी 

-वानवडीच्या गवळी-धाडगेनगर परिसरातील खळबळजनक घटना
– मधमाशांनी नाका-तोंडात प्रवेश केल्याने गुदमरून मृत्यू?
– दशक्रिया विधीनंतर सुरू होती जेवणाची पंगत

वानवडी – दशक्रिया विधी करून पाहुणे घरी जेवणाच्या पंगतीत बसले असताना मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू, तर 24 जण जखमी झाले. ही घटना वानवडी येथील गवळी-धाडगेनगर परिसरात शुक्रवारी घडली. येथील बाबासाहेब गवळी यांच्या दशक्रिया विधीनंतर भोजन ठेवण्यात आले होते. त्यासाठी पाहुणे मंडळी गवळी यांच्या घरी जेवाणास बसले होते. त्याचदरम्यान सुमारे तीन ते चार हजार माशांनी पाहुण्यांवर हल्ला केला. हे समजताच पाहुण्यांनी तेथून जीव मुठीत घेत पळ काढण्यास सुरुवात केली. काहीजण इमारतीमध्ये गेले, तर काहीजण रस्त्याकडे धावत सुटले. यावेळी सुमारे 200 जण उपस्थित होते.

यातील 24 जणांना माशांनी चावा घेतला. यामध्ये दत्तात्रय देवराम गवळी (वय 76) हे पळत असताना मधमाशांनी त्यांचा चेहऱ्यावर चावा घेत त्यांच्या नाका-तोंडात प्रवेश केला. त्यामुळे दत्तात्रय यांचा श्‍वास गुदमरला. त्यांना इनामदार हॉस्पिटल येथे नेताना त्यांचा मृत्यू झाला. यात अन्य दोघांना मधमाशांनी चावा घेतल्यानंतर त्यांनाही धाप लागली. त्यांनाही इनामदार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. यात सोपान विठ्ठल गवळी आणि विजय गवळी यांना अतिदक्षता विभागात, तर प्रकाश माळी यांना बाह्यरुग्ण विभागात दाखल करण्यात आले. अन्य 14 जणांवरही येथेच उपचार करण्यात आले. इतरांवर देशपांडे हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आले.

दरम्यान, हा प्रकार जगनाथ खोपकर यांना समजताच त्यांनी जवळच्या एका खोलीत धाव घेत चादरी, गोधड्या स्वत:भोवती गुंडाळल्या. यातील सोपान गवळी यांना वार्धक्‍यामुळे धाव घेता येत नव्हती. त्यांच्याभोवती मोठ्या प्रमाणात माशा बसल्याचे खोपकर यांनी पाहिल्यावर त्यांनी त्यांच्या अंगावर चादरी टाकून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. हे मधमाशांचे पोळ गवळी यांच्या घराजवळील सिल्व्हर क्रेस्ट सोसायटीमधील पाचव्या मजल्यावरील बंद फ्लॅटच्या गॅलरीमध्ये होते. हा फ्लॅट बंद असल्याने मधमाशांच्या पोळाकडे दुर्लक्ष झाले. हे पोळे अचानक कसे फुटले, याबाबत मात्र अद्याप काहीही समजू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)