जुने कोपरगाव शहर स्मार्ट कधी होणार ?

-शंकर दुपारगुडे

कोपरगाव : समृद्धी महामार्गाच्या रूपाने सध्याचे सरकार समृध्द व गतिमान देश बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हे जरी खरं असलं, तरी काळाच्या पडद्याआड काही शहरे जात आहेत. त्याना कधी समृध्द करणार. वंचित शहरांपैकी एक कोपरगाव शहर आहे. मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाच्या रूपाने राज्यातील सर्वांत मोठा महामार्ग होत आहे. त्यामुळे येथे स्मार्ट सिटी बनविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे नवीन स्मार्ट सिटीचे राहुद्या जुने कोपरगाव शहर कधी स्मार्ट सिटी होणार, असा सवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहे.

कोपरगाव येथून समृद्धी महामार्ग जात आहे. 710 किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर अंदाजे 55 हजार कोटी रुपये सरकार खर्च करीत आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांतून जाणाऱ्या या महामार्गावर 11 स्मार्ट सिटींची निर्मिती होणार आहे. एक स्मार्ट सिटी बनविण्यासाठी अंदाजे शंभर कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कोपरगाव तालुक्‍यातील धोत्रे या गावात नवीन स्मार्ट सिटी तयार होणार आहे. ती स्मार्ट सिटी वसविण्यासाठी शासनाच्या वतीने तब्बल शंभर कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मात्र कोपरगाव तालुक्‍यात सध्याच्या स्थितीत पिण्यासाठी पाणी नाही, शेती उजाड झाली. चारा-पाणी नसल्याने पशुधन संकटात आहे. कोपरगाव शहरातील बाजारपेठ ओस पडली. नागरिकांना पाच दिवसांआड पिण्यासाठी पाणी मिळते आहे. उन्हाळ्यात 21 दिवासांनी पाणीपुरवठा होतो. एकेकाळी जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुका म्हणून कोपरगावची ओळख होती. ओसंडून वाहणारी बाजारपेठ आज ओस पडली.

तालुक्‍याचे हक्काचे 11 टीएमसी पाणी शासनाच्या व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे गेले. त्याचा ठपका तालुक्‍यातील काळे-कोल्हे यांच्यावर ठेवून वरिष्ठ अधिकारी निवृत्त झाले. पूर्वीचे स्मार्ट कोपरगाव शहर आता केवळ गाव राहिल्याचे चित्र दिसत आहे. नवीन स्मार्ट सिटी बनविणाऱ्या सरकारने यापूर्वीचे स्मार्ट असलेले कोपरगाव शहर उजाड केले. त्याला स्मार्ट सिटी कधी बनविणार. नवीन शहर स्मार्ट करण्याबरोबर पूर्वीच्या स्मार्ट शहराची दयनिय अवस्था बदलण्यासाठी त्याला स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

कोपरगावात नागरी सुविधांचा अभाव आहे. आहे त्या तुटपुंज्या सुविधा पुरविण्यासाठी पालिकेत आधिकारी नाहीत. आलेला निधी जाचक अटीमुळे व स्थानिक कारभारामुळे परत जातो. तालुक्‍याचे हक्काचे पाणी गेल्याने तालुक्‍यासह शहराचा विकास खुंटला. कोपरगावचे नागरिक इतर शहरांत व जिल्ह्यांत स्थलांतरित होत आहेत.

तालुक्‍यातून समृध्दी महामार्गाच्या रूपाने विकास मार्ग गेल्यासारखे वाटत असले, तरी कोपरगावचा विकास कितपत होतो, यावर प्रश्‍नचिन्ह आहे. तालुक्‍याला पिण्यासाठी पाणी नाही. मग नवीन स्मार्ट सिटीला कुठून पाणी मिळेल. जर नवीन सिटीला पाणी देण्याची सरकारची तयारी आहे किंवा त्यांच्यासाठी स्वतंत्र तरतुद असेल किंवा सर्व सुविधा देण्यास सक्षम आहेत, तर मग जे तालुक्‍याचे रहिवासी आहेत त्यांच्या हक्काचे पाणी का दिले जात नाही. त्यांच्या हक्काचे कोपरगाव कधी स्मार्ट बनविणार.

वरिष्ठ पातळीवर पाण्याच्या नावाखाली राजकारण सुरू आहे. राजकीय नेतेमंडळी पाण्याच्या प्रश्‍नावर लढाई करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांचा फौजफाटा सामान्य नागरिक आहे. त्या जोरावर पाण्याची लढाई अनेक दशकांपासून सुरू आहे. पण तालुक्‍याचा पाणी प्रश्‍न संपला नाही. मोर्चे, रास्तारोको, धरणे, जेलभरो, रुम्हणे मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधले गेले. मात्र तालुक्‍याला अपेक्षित हक्काचे पाणी मिळत नाही. काळे-कोल्हे यांनी पाण्यासाठी अनेकवेळा संघर्ष केला.

कोर्टाची लढाई लढली. या दोघांच्या अंतर्गत राजकीय संघर्षाचा फायदा वरिष्ठ राजकीय मंडळी व अधिकाऱ्यांनी उचलून वाद वाढविला. पण पाणी वाढविले नाही. समन्यायी पाणी वाटपाच्या निर्णयाने तालुक्‍यातील जनता संभ्रमात आहे. कोणता नियम कोणाला, कोणाचे पाणी कोणासाठी आहे, कोणत्या धरणाचा वापरा कोणत्या लाभ क्षेत्रासाठी किती आहे, याची सविस्त माहिती जलसंपदा विभागाने ठरवून दिलेल्या वेळेत देत नसल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

पाण्याचा ताळमेळ लागत नाही. पिकांचे नियोज करता येत नाही. तालुक्‍यात नागरी सुविधांचा अभाव असल्याने शासकीय नोकरदार कमी राजकीय वतनदार जास्त तयार झाले. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संख्या ज्यास्त पण उच्च पदावरील अधिकाऱ्यांची सख्या कमी. गावातील सुशिक्षित तरुणांसाठी अद्ययावत वाचनालये, क्रीडांगणे, स्पर्धापरीक्षा केंद्र, प्रबोधन संस्कार केंद्र, नाट्यगृह, कमी पण राजकीय पक्षांच्या शाखा वाढल्या.

तालुक्‍याचे वाळवंट झाले असलेली नदीची वाळू महसूल विभागाच्या सतर्कतेने गायब झाली. बंधाऱ्यातील साठवलेले पाणी जायकवाडीला सोडल्याने गोदावरी नदी कोरडी पडली. त्यामुळे सरकारने कोपरगाव तालुक्‍याच्या हक्काच्या पाण्याबाबत नागरिकांची दिशाभूल करण्या ऐवजी दिशा दर्शक योग्य नियोजन करून पाणी देणे अपेक्षित आहे. नवीन स्मार्ट सिटी नक्की बनवा. पण जुन्या स्मार्ट शहरांची सध्याची दशा बदलून त्यांना नव्याने स्मार्ट कधी बनवणार, हा खरा प्रश्‍न आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)