सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यास मारहाण

संगमनेर – प्राध्यापक भरतीच्या मुलाखतीची माहिती असलेली कागदपत्रे न दिल्याच्या रागातून, संगमनेर महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधिक्षकांना शिवीगाळी करुन, मारहाण केल्या प्रकरणी शिवसेनेचे नेते शरद थोरात यांच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक गोरक्षनाथ नामदेव पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान पानसरे त्यांच्या केबीनमध्ये प्रा. डॉ. सुहास आव्हाड व डॉ. दिलीप पोखरकर यांच्या समवेत कार्यालयीन कामकाज करीत असताना, शरद थोरात व त्यांचा मुलगा अभिषेक थोरात यांनी केबीनमध्ये येवून, महाविद्यालयात झालेल्या प्राध्यापक भरतीच्या मुलाखतीची माहिती असलेल्या कागदपत्रांची मागणी केली.

ही कागदपत्रे संस्थेकडे असल्याचे सांगितल्याच्या रागातून शरद थोरात यांनी शिवीगाळी करुन व शर्टची कॉलर पकडून मारहाण केली. तसेच टेबलावरील कागदपत्रांच्या फाईल फेकून दिल्या. सहकारी प्राध्यापकांनी हस्तक्षेप करुन, मारहाण थांबवली. तर अभिषेक याने त्यांना केबीन बाहेर नेले. या मारहाणीत पानसरे यांचा चष्मा व शर्टचे बटन तुटले असून, उजव्या पायाच्या गुडघ्यास मार लागला आहे. याबाबत त्यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा, सेवकास मारहाण व शिवीगाळीचा गुन्हा दाखल झाला असून, शरद थोरात यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय कवडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)