6 लाखांच्या बनावट नोटा बॅंकेत केल्या जमा
पुणे – नोटाबंदीच्या काळात जुन्या चलनातील नोटा बॅंकेत बदलून घेत असताना सहा लाख रुपयांच्या बनावट नोटा जमा करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. टिळक रस्त्यावरील युनियन बॅंक ऑफ इंडिया येथे हा प्रकार नोव्हेंबर 2016 मध्ये हा प्रकार घडला. दरम्यान, नोटाबंदीच्या काळातील या प्रकरणावर तब्बल अडीच वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी बॅंकेतर्फे रोहनकुमार सिंग (रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे संबंधित बॅंकेत व्यवस्थापक आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांच्या शाखेत एका ग्राहकाने चलनातून बाद झालेल्या जुन्या एक हजार रुपयांच्या आणि पाचशे रुपयांच्या नोटा मिळून एकूण 5 लाख 94 हजार रुपये जमा केले. या कालावधीत शाखेत जमा झालेली 600 कोटी रुपयांची रक्कम बदलापूर येथील रिझर्व बॅंकेच्या नोटा छपाई कारखान्यात पाठवून देण्यात आली. तेथे नोटांची तपासणी करीत असताना एका ग्राहकाने भरलेल्या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, याप्रकरणी रोहनकुमार यांनी रक्कम जमा केलेल्या ग्राहकाविरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार डी.आर.गभाले करीत आहेत.