ऑफबीट : तरंगता बोगदा? हे काय आता? (भाग १)

अमोल पवार (कॅलिफोर्निया) 

दोन शहरांना जोडणारा बोगदा डोंगरातून जात असेल तर आपल्याला ती संकल्पना पटू शकते. परंतु समुद्राच्या पोटातून बोगदा काढून दोन शहरे जोडण्याची संकल्पना आजमितीस तशी अजबच. अर्थात नॉर्वेमध्ये अशा एका बोगद्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. हा बोगदा 2035 पर्यंत पूर्णही होण्याची शक्‍यता असून, तसे झाल्यास हा जगातील पहिला तरंगता बोगदा ठरेल. चीन, दक्षिण कोरिया, इटली आणि इंडोनेशिया या देशांमध्येही असे प्रयत्न सुरू असून, जहाज वाहतूक सुरळीत ठेवून समुद्राच्या पोटातून बोगदा काढण्याचे काम आव्हानात्मक आहे.

काही वर्षांपूर्वी अशक्‍यप्राय वाटणाऱ्या गोष्टी आज सहजशक्‍य झाल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात अशक्‍य असे काही उरणारच नाही, अशी स्थिती निर्माण होताना दिसते आहे. समुद्राच्या पोटातून रस्ते काढणेही आता लवकरच होणार आहे आणि या रस्त्यांवरून आपण महामार्गाप्रमाणे गतीने प्रवासही करू शकणार आहोत. समुद्रमार्गाने एका शहरातून दुसऱ्या शहरात लवकरात लवकर पोहोचता यावे यासाठी नॉर्वेमध्ये एक आगळावेगळा प्रयोग सध्या करण्यात येत आहे. तिथे समुद्रात एक तरंगता बोगदा तयार करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंक्रिटच्या या बोगद्यातून रस्त्याच्या दोन लेन जातील. नॉर्वेजियन पब्लिक रोड्‌स ऍडमिनिस्ट्रेशन या रस्ते तयार करणाऱ्या सरकारी संस्थेने हा प्रकल्प 2035 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यास ते खरोखर एक आश्‍चर्य असेल. कारण अशा प्रकारचा सागरी बोगदा तयार करणारा नॉर्वे हा पहिला देश ठरेल. चीन, दक्षिण कोरिया, इटली आणि इंडोनेशिया हे देशही अशा प्रकारचा बोगदा तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नॉर्वेमध्ये तयार होत असलेला बोगदा समुद्रसपाटीपासून शंभर फूट खोल असेल. या बोगद्याची लांबी 205 किलोमीटर असेल. बोगद्यातील वाहतुकीची जोडणी करणारे छोटे पूल समुद्राच्या पृष्ठभागावर असतील. या पुलांमध्ये विशिष्ट अंतर राखलेले असेल, जेणेकरून समुद्रातील जहाजे दोन पुलांच्या मधून व्यवस्थित प्रवास करू शकतील. समुद्रातील बोगदा इतका मजबूत असेल की, कोणत्याही ऋतूचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही.

हा बोगदा तयार करण्यासाठी चाळीस अब्ज डॉलर खर्च येणार आहे. पश्‍चिम नॉर्वेतील क्रिस्टियानासॅंड आणि ट्रॉनहॅम या दोन शहरांना जोडणारा हा सागरी बोगदा असेल. हा मार्ग नॉर्वेसाठी अत्यंत हितकारक ठरणार आहे. या दोन शहरांमधील अंतर 1100 किलोमीटर असून, हे अंतर पार करण्यासाठी सध्या 21 तास लागतात. परंतु बोगदा तयार झाल्यानंतर हे अंतर अवघ्या काही तासांतच पार करता येईल. तरंगत्या बोगद्याची ही संकल्पना नवीन नाही. 1882 मध्ये ब्रिटिश नौदलातील आर्किटेक्‍ट एडवर्ड रीड यांनीही अशाच प्रकारच्या एका बोगद्याचा प्रस्ताव समोर आणला होता.

नॉर्वेतील किनारी प्रदेश हा अत्यंत नयनरम्य पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो. संपूर्ण जगभरातून पर्यटक येथे फिरायला येतात. आसपासच्या क्षेत्रातून नॉर्वेच्या समुद्रकिनारी शहरांमध्ये येण्यासाठी मोठी यातायात करावी लागते. संपूर्ण जगभरातून येणाऱ्या पर्यटकांचा विचार करून समुद्रातील बोगद्याची संकल्पना पुढे आली असून, हा बोगदा तयार झाल्यास तो स्थापत्यशास्त्राचा एक अद्वितीय नमुना ठरणार आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी कॉंक्रिटच्या पाइपचा वापर केला जाणार आहे. सुमारे 12000 मीटर लांबीचे दोन पाइप वक्राकार वळविलेले असतील.

समुद्राच्या पृष्ठभागापासून शंभर मीटर खाली हा बोगदा तयार केला जाईल. क्रिस्टियानसॅंड आणि ट्रोनहॅम या दोन शहरांदरम्यान पूल बांधणेही शक्‍य नव्हते. तसेच समुद्रकिनाराही अखंडित नसून, वेडावाकडा आणि विखंडित (फियोर्डस) असल्यामुळे या किनाऱ्यावरून रस्ता तयार करणे शक्‍य नाही. फियोर्ड लाइन म्हणजे समुद्राचे पाणी जमिनीच्या भागात शिरणाऱ्या जागा. असे पाण्याचे भाग नॉर्वेत अनेक ठिकाणी पाच किलोमीटर रुंदीचेही असू शकतात. अभियांत्रिकी तंत्राच्या माध्यमातून या समस्येवर तोडगा काढणे शक्‍य नाही. त्यामुळे किनाऱ्यापासून आत येऊन मग दुसऱ्या शहराकडे जावे लागते. त्यामुळे प्रवासाचे अंतर आणि वेळही वाढतो. अखेर नॉर्वेच्या प्रशासनाने बोगद्याचा पर्याय पुढे आणला. 2035 पर्यंत बोगदा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गाठणे नॉर्वेला शक्‍य झाले तर चीन आणि इतर देशांना मागे टाकून नॉर्वे या तंत्रज्ञानात अव्वल ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)