दोन शहरांना जोडणारा बोगदा डोंगरातून जात असेल तर आपल्याला ती संकल्पना पटू शकते. परंतु समुद्राच्या पोटातून बोगदा काढून दोन शहरे जोडण्याची संकल्पना आजमितीस तशी अजबच. अर्थात नॉर्वेमध्ये अशा एका बोगद्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. हा बोगदा 2035 पर्यंत पूर्णही होण्याची शक्यता असून, तसे झाल्यास हा जगातील पहिला तरंगता बोगदा ठरेल. चीन, दक्षिण कोरिया, इटली आणि इंडोनेशिया या देशांमध्येही असे प्रयत्न सुरू असून, जहाज वाहतूक सुरळीत ठेवून समुद्राच्या पोटातून बोगदा काढण्याचे काम आव्हानात्मक आहे.
समुद्राच्या पृष्ठभागावर काही पोलादी बॉक्स असतील आणि त्याला हा बोगदा जोडलेला असेल. त्यासाठी टेन्शन लेग्ज नावाच्या स्टील पाइप्सचा वापर केला जाणार आहे. नॉर्वेच्या सरकारी यंत्रणेला काही कंपन्याही याबाबत मदत करणार आहेत. पृष्ठभागावर तरंगणारे पोलादी बॉक्स म्हणजेच फ्लोटिंग प्लॅटून्स एकमेकांपासून बरेच दूर अंतरावर असणार आहेत. त्यांचाच आधार या तरंगत्या बोगद्याला असणार आहे.
नॉर्वेजियन पब्लिक रोड्स ऍड्म्÷िम्÷मनिस्ट्रेशनला अशा प्रकारचा बोगदा बांधण्याचा कोणताही पूर्वअनुभव नसतानासुद्धा हे धाडस केले जात आहे. त्यामुळे संगणकावर अनेक मॉडेल्स तयार करून समुद्रातील प्रवाह आणि लाटा त्याचप्रमाणे खोली आणि समुद्रातील जहाजांची वाहतूक या सर्वांचा विचार करून हा प्रकल्प पुढे जात असल्यामुळेच तो पूर्ण होण्यास इतकी वर्षे लागणार आहेत. कॉम्प्युटर मॉडेलिंग टेस्ट्स नॉर्वेच्या युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये घेण्यात येत आहेत. या मॉडेल चाचणीतून असे दिसून आले आहे की, बोगदा बांधून पूर्ण झाल्यानंतर समुद्री प्रवाह आणि लाटा यांमुळे तो एक मीटर डावीकडे आणि उजवीकडे असा झुलू शकतो. म्हणजेच हा झुलता बोगदा असणार आहे. मात्र बोगद्याची ही हालचाल समजून येणार नाही इतकी हळूवार असेल.
ऩॉर्वेतील अधिकाऱ्यांना आणि अभियंत्यांना यासंदर्भातील जगाच्या पाठीवरील विविध अनुभवांचा अभ्यास करून पुढे जावे लागणार आहे. 1960 च्या दशकात मेसिना आणि कॅलेब्रिया सिसिली असा सागरी बोगदा तयार करण्याचा प्रकल्प इटलीमध्ये प्रस्तावित होता. त्यानंतर अशाच प्रकारच्या पुलाची संकल्पना 1985 मध्येही पुढे आली होती. अशा प्रकारच्या संकल्पना वारंवार पुढे येऊ लागल्यानंतर युरोपीय महासंघाने तरंगत्या बोगद्यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती.
या समितीच्या संशोधनाला आणि कामाला नॉर्वेतील खासगी आणि सरकारी कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि विकसित तंत्रज्ञानावर प्रयोग करणारी संघटनाही स्थापन केली. सबमर्ज्ड फ्लोटिंग टनेल कंपनी असे नाव या संघटनेस देण्यात आले. गेल्या काही वर्षांत तरंगत्या बोगद्यांसाठी योग्य अशा अनेक जागा जगभरात शोधून काढण्यात आल्या आहेत. जपानने तीन क्रॉसिंग पॉइन्ट्सचा अभ्यास केला असून, फुंका बे ते होकैदो दरम्यानच्या तीस किलोमीटरच्या बोगद्यासह अन्य काही ठिकाणी असा बोगदा उभारता येईल का, यावर जपानमध्ये विचार केला जात आहे. परंतु कामातील प्रगती पाहता नॉर्वेतील बोगदा सर्वांत लवकर तयार होईल, असे दिसते. असे झाल्यास नॉर्वेचे जगातील आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्व खूपच वाढणार आहे.
बोगद्याचे पिलर तयार करण्यासाठी समुद्रतळाशी 392 मीटर म्हणजेच 1286 फूट खोदकाम केले जाणार आहे. या खोदकामाची लांबी 27 किलोमीटर इतकी असेल बोगदा समुद्राच्या पृष्ठभागापासून शंभर फूट खोलीवरच का केला जात आहे, याचे कारण सांगताना मुख्य अभियंता एरियाना मिनोरेती यांनी सांगितले की, समुद्रतळाच्या तुलनेत सखोल भागात लाटांचा वेग कमी असतो. क्रिस्टियानसॅंड आणि ट्रोनहॅम ही दोन्ही नॉर्वेतील प्रमुख शहरे असून, या शहरांना जोडणारा मार्गही देशातील सर्वांत महत्त्वाचा मार्ग मानला जातो.
नॉर्वेची 50 टक्के निर्यात समुद्रमार्गाने होते. युरोपमधील निकषांनुसार प्रमुख रस्त्याचा स्तर आजमितीस नाही. या पार्श्वभूमीवर तयार होणारा समुद्री बोगदा तिहेरी सस्पेन्शनमुळे आणि पाच तरंगत्या पुलांमुळे अतिशय भक्कम होईल. संपूर्ण संरचनेला पोनटून पुलाचा आधार दिलेला असेल. हा बोगदा पर्यटकांसाठी आणि संपूर्ण जगासाठी एक आकर्षण केंद्र ठरेल, असा विश्वास बोगदा तयार करणाऱ्या चमूतील अभियंत्यांना वाटतो. त्यामुळे नॉर्वेतील पर्यटन उद्योग आणखी बहरणार आहे.
पश्चिम नॉर्वेमध्ये बोगद्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. जगातील हा दुसऱ्या क्रमांकाचा लांब बोगदा असणार आहे. बोगदा पाण्याखाली बांधला जात असला, तरी त्याचे चबुतरे पाण्याच्या वर दिसून येतील. दोन चबुतऱ्यांच्या मधून मोठमोठी जहाजे आणि क्रूझ जाऊ शकतील. सबमर्ज फ्लोटिंग टनेल (एसएफटी) नावाचा हा प्रकल्प यशस्वी झाल्यास जगातील ते एक आश्चर्य आणि सोैंदर्यस्थळ ठरेल.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा