चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये अतिदक्षतेचा इशारा 

पूर्वेला “लुबान’, पश्‍चिमेला “तितली” एकाचवेळी देशाभोवती दोन चक्रीवादळे
 
पणजी: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे लुबान चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर बंगालच्या खाडीत आणखी एक “तितली’ चक्रीवादळ उठल्यामुळे हवामानासंबंधी संस्थांनी सतर्कतेचे इशारे जारी केले आहेत. पूर्व, मध्य, दक्षिण व पश्‍चिम भारतातील बहुतांश राज्यात अनेक ठिकाणी पाच दिवस पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
तासाला 100 ते 110 किलोमीटर वेगाने ओरिसा किनाऱ्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असलेले तितली चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झाले असून 11 ऑक्‍टोबरच्या पहाटे ते ओरिसाच्या गोलकपूर किनाऱ्याला ताशी 110 ते 125 किलोमीटर आदळेल असा अंदाज हवामान खात्याच्या चक्रीवादळ विभागाने वर्तवला आहे. त्यापूर्वीचे तीन दिवस व त्या नंतरचे दोन दिवस म्हणजेच 5 दिवस या चक्रीवादळाचा परिणाम राहणार आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. गोव्यावरही या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. 12 ऑक्‍टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.
दुसऱ्या बाजूने अरबी समुद्रात उठलेल्या लुबान चक्रीवादळाची गतीही आता वाढून ताशी 110 किलोमीटरवर गेल्यामुळे त्याची तीव्रता वाढली आहे. परंतु ते येमेनच्या दिशेने सरकले असल्यामुळे लक्षद्वीप वगळता भारतावर फारसा परिणाम होणार नाही. गोव्यात काही ठिकाणी रविवारी व सोमवारी पाऊस पडला होता. मंगळवारीही काही प्रमाणात पाऊस कोसळला. लुबान चक्रीवादळ भारतीय उपखंडापासून दूर जात आहे. तर तितली बंगालच्या उपसागरातून भारतीय भूभागात शिरत आहे. त्यामुळे लुबानपेक्षा तितली चक्रीवादळ अधिक धोकादायक ठरण्याची शक्‍यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तितली चक्रीवादळ अधिक तीव्र झाले असून ते ओडिसा आणि आंध्र प्रदेशमधील किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. गुरुवारी सकाळी गोपालपूर आणि कलिंगपट्टणम दरम्यान हे वादळ धडकण्याची शक्‍यता असून चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर ओडिसा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर ओडिसा सरकारने राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. आपातकालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
चक्रीवादळाविषयी माहिती देताना हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा म्हणाले. चक्रीवादळामुळे ओडिसामधील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्‍यता आहे. गुरुवारी वादळी वारे 125 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहतील, असे त्यांनी सांगितले. ओडिसा सरकारने पुरी, गजपती, जगतसिंहपूर या भागांमधील शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमधील मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन सरकारी यंत्रणांनी केले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)