नदीपात्रातील मेट्रोच्या खांबांमुळे वहनक्षमतेला बाधा

खा. वंदना चव्हाण : जैवविविधता नष्ट होण्याची भीती

पुणे – नदीपात्रात बांधलेल्या मेट्रोच्या खांबांमुळे नदीच्या वहनक्षमतेला बाधा निर्माण होऊन भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते, असा दावा खासदार वंदना चव्हाण यांनी केला आहे. शुक्रवारी “ग्रीन पुणे मुव्हमेन्ट’ तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नदीपात्रात बांधल्या जाणाऱ्या मेट्रो खांबांच्या बांधणीवर आक्षेप घेतला.

“मेट्रोच्या कामासाठी नदीपात्रात राडारोडा टाकण्यात आला आहे, तसेच मेट्रोच्या खांबांभोवती आठ-दहा फूट सिमेंट-कॉंक्रिटचा चौथरा बांधण्यात आला आहे. त्यामुळे जैवविविधता नष्ट होणार असून, नदीच्या नैसर्गिक वहनक्षमतेला बाधा निर्माण होणार आहे. शहराचा सत्यानाश होत असताना महापौर, पालकमंत्री गप्प असल्याने आता मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करावा,’अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे. या वेळी पर्यावरणवादी कार्यकर्ते सारंग यादवडकर, सुजीत पटवर्धन, अनिता गोखले-बेनिंजर, सतीश खोत आदी उपस्थित होते.

“राष्ट्रीय हरित लवादा’ने (एनजीटी) नदीपात्रात फक्त मेट्रोचे खांब उभारण्यास परवानगी दिली आहे. त्या वेळी नदीपात्रात मेट्रोच्या 59 खांबांव्यतिरिक्त कोणतेही बांधकाम केले जाणार नाही, पूररेषेअंतर्गत कसलाही भराव टाकला जाणार नाही, असे प्रतिज्ञापत्र पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी “एनजीटी’पुढे दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात मेट्रोच्या कामासाठी नदीपात्रात दहा फूट उंचीचा भराव टाकण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आल्याने संगम पुलाखालील नदीच्या प्रवाहाला केवळ 15 ते 20 फूट जागा शिल्लक राहिली आहे, अशी माहिती यावेळी यादवाडकर यांनी दिली. या गंभीर प्रकाराकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असून, नदीपात्रात फक्त मेट्रोच्या खांबांना परवानगी द्यावी, तसेच राडारोडा काढून टाकण्यात यावा, तोपर्यंत मेट्रोचे काम बंद ठेवावे, अशी मागणीही चव्हाण आणि बेनिंजर यांनी केली.

वाढीव “एफएसआय’ला विरोध

मेट्रो, एचसीएमटीआर प्रकल्पांच्या प्रभाव क्षेत्रात (टीओडी झोन) कमाल चारपर्यंत चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याच्या निर्णयालाही चव्हाण यांनी कडाडून विरोध केला आहे. शहराची लोकसंख्या वाढली असून, पाणीपुरवठा, मैलापाण्याचे व्यवस्थापन नीट होत नाही. दाटीवाटीने लोक राहात आहेत. तरीही एफएसआय वाढवायचा का, असा सवाल त्यांनी केला. निवडणुकीच्या काळात इतका महत्त्वाचा निर्णय सरकार घेत असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
 
पावसाळ्यापूर्वी भराव काढणार : महामेट्रो

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, सर्वोच्च न्यायालय आणि मेट्रोच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीची पूर्वपरवानगी घेऊनच नदीपात्राच्या कडेला काम केले जात आहे. मेट्रोच्या बांधकामासाठी आवश्‍यक साधनसामग्री नेणाऱ्या वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात भराव टाकण्यात आला आहे. संगम पुलापाशीही नदीपात्रात खांबांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी भराव टाकला आहे. परंतु, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून सर्व भराव काढून टाकला जाणार असल्याचे स्पष्टीकरण “महामेट्रो’चे जनसंपर्क अधिकारी डॉ. हेमंत सोनावणे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)