पोषण महात्म्य (भाग-1)

-डाॅ.तेजस लिमये

पोषण ही सर्वसमावेशक अशी संज्ञा आहे. पोषण म्हटले की शरीराचे, असे चटकन आपल्या डोक्‍यात येते, पण फक्त शरीराचे पोषण पुरेसे नाही. मनाचे पोषणसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

आपण टीव्हीवर अनेक अन्नपदार्थांचे पोषणमूल्य वाढवणारी नवीन नवीन उत्पादने पाहतो आणि घेतोही, पण मनाचे पोषण होण्याची गरज कोणालाच वाटत नाही. उलट मनाला पोषक अशा फार थोड्या गोष्टी होत असतात. आपले संपूर्ण कुटुंब महिन्यातून एकदा सिनेमा पाहायला, दर आठवड्याला हॉटेलमध्ये अगदी कटाक्षाने करतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पण कोणी मुद्दाम मुलांना दर आठवड्याला एखादे चांगले पुस्तक वाचायला देणे, शाळेत जे विज्ञान शिकतो त्यातील पान आणि फुलांचा बागेत जाऊन अभ्यास करणे, ट्रेकिंगला जाणे, गडकिल्ल्यांची माहिती देणे, थोर लोकांची महती सांगणे, असे काहीही करत नाही. खरे तर शारीरिक व मानसिक पोषण मिळूनच एक चांगली व्यक्ती तयार होत असते.

शरीर ज्या घटकांचे बनलेले आहे, ते घटक शरीराला अखंडपणे पुरवत राहणे, हा पोषणाचा एक भाग आहे. रोजच्या गरजांच्या मधले भात, भाजी, वरण, पोळी हे अगदी साधे मुलभूत पोषण झाले, पण आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात, शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक बारीक-सारीक पोषणतत्त्वांची गरज असते. हे सर्व मिळण्यासाठी आहारामध्ये सर्व पदार्थ आलटून पालटून मिळतात ना, हे बघणे खूप गरजेचे आहे. त्याप्रमाणे त्याचे प्रमाण किती असावे, हा भाग खूप महत्त्वाचा आहे.

सुक्‍या मेव्याचे प्रमाण व वरण भात, भाजी पोळी यांचे प्रमाण हे स्पष्ट करते की, सुक्‍या मेव्यात असलेली पोषणतत्त्वे ही अतिमहत्त्वाची तर आहेतच, पण ती अतिसूक्ष्म व तुलनेने कमी प्रमाणात लागणारीही आहेत. उदाहरणार्थ प्रथिने ही अमायनो आम्लांची बनलेली असतात. एकूण अमायनो आम्लांपैकी काही शरीरात तयार होतात तर काही अन्नातून मिळतात. अन्नामधील प्रथिनांचे स्रोत म्हणजे डाळी कडधान्ये. आपल्या जेवणामध्ये याचा भरपूर प्रमाणावर वापर असावाच, पण ह्या व्यतिरिक्त काही सूक्ष्म आम्ले ही शरीरात निर्माण होत नाहीत, पण फक्त सुक्‍या मेव्यात असतात आणि स्नायूंच्या कार्यात त्याचे अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे आलटून पालटून रोजच सुका मेवा थोड्या प्रमाणात घेतला पाहिजे, ज्यायोगे शरीराचे सर्वसाधारण नव्हे तर संपूर्ण पोषण होईल.

खनिजे व जीवनसत्वांचे पण असेच खूप प्रकार आहेत. एकाच प्रकारच्या अन्नातून मिळत नाहीत त्यामुळे फळे व भाज्या खाताना सर्व प्रकार खाणे होते आहे किंवा नाही इकडे गृहिणीने लक्ष देणे आवश्‍यक आहे. अंजीर, पीच, द्राक्ष, ओली खारीक, अशी फळे ताजी व सुकी दोन्ही मिळतात. फळ ताजे व सुके दोन्ही मिळत असले तरीही दोन्ही स्वरूपातील पोषणमूल्यांमध्ये खूप फरक पडतो. इथे कोणते जास्त चांगल्या दर्जाचे व कोणते दुय्यम दर्जाचे अशी तुलना चुकीची ठरू शकेल.

भाज्यांमध्ये सुद्धा फळभाज्या, पालेभाज्या, सलाड, असे विविध प्रकार खावेत म्हणजे जे पोषकतत्त्व एकात नाही तर दुसऱ्यात मिळून जाते. तांदूळसुद्धा एकाच प्रकारचे वापरण्यापेक्षा आलटून पालटून वेगवेगळे वापरावेत. ह्या सगळ्याचे कारण एकच की एक प्रकारच्या अन्नधान्यात जे नाही ते दुसऱ्यात आहे. अशा पद्धतीने आपण शरीराचे पोषण करून शकतो.

सर्व पोषकतत्त्वे उत्तम पद्धतीने हव्या त्या पद्धतीने मिळत राहिल्यास आपले शरीर तंदुरुस्त राहीलच, पण त्यासोबत मेंदूचीसुद्धा कार्यक्षमता वाढेल. चांगले आचार विचार ह्यासाठी सात्विक अन्न व त्यामुळे मनाचे सात्विक पोषण होईल. जन्मापासून ते एकवीस वर्षांपर्यंतचे पोषण हे शरीरिक व मानसिक वाढ, मेंदूची तल्लखता, भावनिक वाढ, अशा अनेक वाढीशी संबंधित आहे. पुढे लग्न झाल्यावर चाळिशीपर्यंत जननसंस्थेसंबंधीचे पोषण महत्त्वाचे आहे.

पोषण महात्म्य (भाग-2)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)