कोलंबो – श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉंबस्फोटात मरण पावलेल्या विदेशी नागरीकांची संख्या आता 42 झाली आहे. त्यात 11 भारतीयांचा समावेश आहे. या स्फोटात जखमी झालेल्या दोन चिनी नागरीकांचे आज निधन झाले. ठार झालेल्या एकूण 42 विदेशी नागरीकांमध्ये बांगलादेशचा एक, चीनचे चार, सौदी अरेबिया , स्पेन, तुर्कीचे प्रत्येकी दोन, ब्रिटनचे सहा, डेन्मार्कचे तीन, अमेरिकेचा एक, जपान, नेदरलॅंड, पोर्तुगाल, स्वीत्झर्लंड या देशाचा प्रत्येकी एक असे विदेशी नागरीक ठार झाले आहेत.
अद्याप बारा विदेशी नागरीक बेपत्ता असून त्यांचाही मृतांमध्ये समावेश असू शकतो असा कयास आहे. ठार झालेल्या अनेक नागरीकांच्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्याचे काम अजून सुरू आहे. जखमींमध्ये पाच विदेशी नागरीकांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर आहे असे सांगण्यात येते.