आता स्वच्छतेची “स्टंटबाजी’

अजित पवारांची टीका

स्वच्छता मोहिमेत झाडू हातात घेतलेल्या हेमामालिनी यांच्यावर अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत टीका करत स्टंटबाजीचा आरोप केला होता. आज त्यांच्याच चिरंजिवाने झाडु हातात घेत स्टंटबाजी केली. यावर अजित पवार बोलणार का? अशी चर्चा शहरात रंगली आहे.

पिंपरी  – लोकसभा निवडणुकी दरम्यान रिकाम्या लोकलमधून प्रवास, वाहतूक कोंडी आहे म्हणून धावत सुटणे, टाळ वाजविणे, यासह विविध विषयांवरून “ट्रोल’ झालेले पार्थ पवार आज स्वच्छतेच्या मोहिमेवरून चर्चेत आले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शहरातील एकाही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होणाऱ्या पार्थ पवार यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसा दिवशी राष्ट्रवादीच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. केवळ फोटो आणि व्हिडीओबाजीनंतर ही मोहीम संपुष्टात आल्याने ही केवळ स्टंटबाजीच होती, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार स्वतः दिवसभर शहरात उपस्थित होते. सोमवारी सकाळी दहा वाजताच त्यांनी पिंपरी येथील भाजी मंडई गाठली. नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसोबत स्वतः हातात झाडू घेऊन हा परिसर स्वच्छ केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पार्थ यांच्या उपस्थितीत यानंतर महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली आणि कचरा समस्येवर चर्चा केली.

यावेळी पार्थ पवार म्हणाले की, शहरातील आठही क्षेत्रीय कार्यलयांमध्ये स्वच्छता दररोज झालीच पाहिजे, कचरा संकलित करणाऱ्या नवीन गाड्याची उंची जास्त असल्यामुळे त्यांची उंची कमी करण्यात यावी, जेणेकरून महिलांना कचरा टाकण्यास अडचण येणार नाही. प्रत्येक कचऱ्याच्या गाडीवर एक मदतणीस नियुक्त करावा, यासह विविध मागण्या त्यांनी आयुक्तांसमोर केल्या.

आज संपूर्ण शहर कचऱ्याच्या समस्येशी झुंजत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांमध्ये योग्य विरोधी पक्षाप्रमाणे कोणतीही पाऊले उचलली नाहीत. परंतु अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध उपक्रमांमध्ये स्वच्छता हा उपक्रम राबवून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला. जी समस्या नागरिकांना त्रस्त करत आहे, त्या समस्येचा देखील पुन्हा एकदा प्रसिद्धीसाठी वापर करुन घेण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आणखी प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)