आता मतदानयंत्रांना मिळणार कुलरची हवा

सोरमोरे : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

33 लाख 10 हजार 540

रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर शिर्डी मतदार संघात विविध ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या 36 पथकाकडून 22 लाख 89 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्याची प्राप्तिकर विभागाकडून तपासणी सुरू आहे. तसेच 16 हजार 174 लीटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. असा एकूण 33 लाख 10 हजार 540 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नगर – नगर मतदारसंघात मतदान यंत्र बिघाडीच्या अनुभवानंतर जिल्हा प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघांतील मतदान केंद्रामधील पत्र्याच्या खोल्यांमध्ये मतदान यंत्राजवळ कुलर बसविण्यात येणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी पिराजी सोरमोरे यांनी सांगितले. नगर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार (दि.26) रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिर्डी लोकसभा निवडणूक आयोगाचे खर्च निरीक्षक विरेंद्रसिंग बंकावत, उपजिल्हानिवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार हेमा बडे, नायब तहसीलदार गोसावी आदी उपस्थित होते. लोकसभा मतदार संघासाठी येत्या 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली आहे.

शिर्डी लोकसभा निवडणुकीत 15 लाख 84 हजार 303 मतदार असून अधिकाधिक नागरिकांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा. असे आवाहन त्यांनी केले. नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत पत्र्याच्या खोलीत असलेल्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे बंद पडल्याच्या घटणा घडल्या आहेत. अशा घटणा घडू नयेत यासाठी अनेक मतदान केंद्रावर कुलर बसविले जाणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी सोरमारे यांनी सांगितले.

शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी 8 लाख 21 हजार 401 पुरुष, 7 लाख 62 हजार 832 महिला तर इतर 70 मतदार आहेत. निवडणूक कामासाठी नेमणूक असलेल्या 6 हजार 548 मतदारांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 1 हजार 710 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 10 हजार 260 अधिकारी, कर्मचारी व 159 क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

तर मतदानाच्या कालावधीत जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदार संघातील 174 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार असून इतर 101 मतदानकेंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे 9 मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले असून येथील सर्व अधिकारी, कर्मचारी हे महिला असणार आहे. लोकसभा निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.

28 एप्रिल रोजी निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विधानसभा क्षेत्रानुसार मतदानाचे साहित्य वाटप केले जाणार आहे. मतदानाच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोल घेण्यात येणार असून 7 वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी यंत्रणा सज्ज असून कोणत्याही प्रकारचे आचारसंहिता उल्लंघन होऊ नये, याची दक्षता सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)