आता “भाकरी’ फिरवण्याची गरज – डॉ.कोल्हे

हवेली तालुक्‍यातील गावभेटीला ग्रामस्थांचा प्रतिसाद : सरकारवर टीका

शिंदेवाडी – ही निवडणूक दोन पक्षांची नाही तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. त्यामुळे आता परिवर्तन घडलेच पाहिजे. एकीकडे उद्योगपतींना कर्ज देऊन त्यांना ती माफ करण्यासाठी “राईट ऑफ’चा निकष लावला; पण शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत ठोस धोरण नाही. पाच-पन्नास हजारांच्या कर्जामुळे शेतकरी बांधव मृत्युला कवटाळत आहे; मात्र हे सरकार काळजी फक्त उद्योगपतींची घेत आहे, अशी टीका शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

डॉ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ हवेली तालुक्‍यात ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शिंदेवाडी येथील सभेस माजी आमदार दिलीप ढमढेरे, अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, शंकर भूमकर, माणिकराव गोते, सुभाष जगताप, जि. प. सदस्या कल्पना जगताप, तुकाराम शितोळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. डॉ. कोल्हे म्हणाले रोजगार, विकासदराची घसरण, महागाई या मुद्‌द्‌यांचे काय झाले? आठवा त्या जाहिराती, किती खऱ्या किती खोट्या? याचा आता गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

15 वर्षे झाली, मतदारसंघातील लोकांचे प्रश्‍न सुटत नाहीत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामे झाली आहेत आणि हे दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रकार करीत आहेत, असा आरोप कोल्हे यांनी केला. त्यामुळे “आयत्या पिठावर रेघोट्या’ मारणाऱ्यांना व सर्वांगीण विकासासाठी भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे. आपले खासदार हेही शेतकरी असल्याचे सांगतात पण ते उद्योगपती आहेत. मग त्यांनी आजपर्यंत संसदेत शेतकऱ्यांसाठी किती प्रश्‍न विचारले, याचा जाब आपण विचारला पाहिजे.

शेतकऱ्यांचे मरण हेच यांचे धोरण असेल तर अशा प्रवृत्तींना आता मतदानातून दाखवून दिले पाहिजे, अशी टीका विकास लवांडे यांनी केली. तसेच विविध वक्‍त्यांनी खासदार आढळराव यांच्यावर टीका करून त्यांच्या 15 वर्षांच्या कारभाराला लक्ष्य केले. डॉ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ हवेली तालुक्‍यातील वाडेबोल्हाई, शिरसवाडी, बिवरी, अष्टापूर, हिंगणगाव, शिंदेवाडी, सांगवीसांडस, पिंपरीसांडस, बुर्केगाव, डोंगरगाव, पेरणे, वढु, फुलगाव, तुळापूर, लोणीकंद, बकोरी, वाघोली, भावडी आदी गावांमध्ये प्रचाराचे आयोजन करण्यात आले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)