मालेगाव – मोदी म्हणतात मी झोपत नाही. मला झोप येत नाही. मी साडेचार तास झोपतो. पण झोप येत नाही, कारण घरात कोणीही नाही. तुम्ही एकटे राहता, तर झोप कशी येईल? मोदीजी झोपून जा आता. आता तुमच्या झोपण्याचे दिवस आले आहेत, अशी बोचरी टिका एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.
धुळे मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहेमदुल्ला यांची मालेगावात प्रचारसभा झाली. त्यावेळी अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मुलाखतीवरुन ओवेसींनी टीका केली. मुशर्वत चौकात झालेल्या या सभेला मुस्लीम बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
ओवेसी म्हणाले, टीव्हीवरील अँकर त्यांच्यासारखी ऍक्टिंग करु शकत नव्हते, म्हणून मोदी खऱ्या ऍक्टरला घेऊन आले. पण अभिनेताही गोंधळला असेल की मला अभिनयासाठी पैसे मिळतात आणि मोदी तर माझ्यापेक्षा चांगला अभिनय करतात, असा टोला त्यांनी लगाविला.