कर्वे रस्त्यावर आता चक्राकार वाहतूक

– एसएनडीटी चौकापासून डेक्‍कनकडे येणारा रस्ता बंद

– मेट्रोच्या दुहेरी उड्डाणपुलाचे काम सुरू होणार


– मंगळवारच्या भेटीनंतर अंमलबजावणी होण्याची चिन्हे

पुणे – वनाज ते धान्य गोदाम मेट्रोमार्गात नळस्टॉप चौकात दुहेरी उड्डाणपूल उभारण्याचे काम पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे एसएनडीटी चौक ते अभिनव चौकापर्यंत डेक्कनकडे येणारा कर्वे रस्ता बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून या मार्गावरील वाहतूक चक्राकार पद्धतीने वळविण्यात येणार आहे. तत्पूर्वी वाहतूक पोलीस, महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकारी या नियोजनाची संयुक्‍त पाहणी करणार आहेत.

-Ads-

या बदलाबद्दलची माहिती या मेट्रो मार्गाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कर्वे रस्त्यावरील मेट्रो मार्गासह अभिनव चौक आणि नळस्टॉप चौकात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो आणि इतर वाहतुकीसाठीचा दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी झाले असून प्रत्यक्ष कामास पुढील आठवड्यात सुरूवात होणार आहे.

हा पूल एसएनडीटी महाविद्यालयापासून पुढे जाणार असल्याने येथील मेट्रो स्टेशन आणि या दुमजली उड्डाणपुलाचे काम एकाच वेळी सुरू केले जाणार आहे. त्यासाठी महामेट्रोने वाहतूक पोलिसांची परवानगी मागितली होती. ती मिळाली आहे. मात्र, ही चक्राकार वाहतूक केल्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन येत्या मंगळवारी वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते या महामेट्रो आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी करणार असून या पाहणीनंतर पुढील एक ते दोन दिवसांत ही चक्राकार वाहतूक सुरू होणे अपेक्षित असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. या दुमजली उड्डाणपुलासाठी एकूण 18 खांब बांधले जाणार असून त्यातील 13 खांबांवर दुमजली उड्डाणपूल असणार आहे. तर 5 खांबावर पुलाच्या उताराचा भार असणार आहे.

अशी असेल वाहतूक
महामेट्रोकडून नियोजन करण्यात आलेली ही चक्राकार वाहतूक कर्वे रस्त्याकडून डेक्कनकडे येणाऱ्या वाहनांसाठी असणार आहे. त्यानुसार, कर्वे रस्त्यावरून पुढे आलेली वाहने एसएनडीटी महाविद्यालायच्या समोरून विधि महाविद्यालय रस्त्यावरील आठवले चौकात येतील, त्या ठिकाणी वळसा घेऊन ही वाहने पुन्हा अभिनव चौकात कर्वे रस्त्यावर येतील. ही वाहतूक वळविल्यानंतर एसएनडीटी महाविद्यालय ते अभिनव चौकापर्यंत डेक्कनकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद असणार आहे. तर डेक्कनकडून कर्वे रस्त्याने तसेच पुढे पौड रस्त्यावर जाणारी वाहतूक नियमितपणे सुरू राहणार असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

 

यापूर्वीही झाला चक्राकार प्रयोग
तत्कालिन वाहतूक पोलीस उपाक्‍त अशोक मोराळे यांनी मेट्रोचे काम सुरू होण्यापूर्वी रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चक्राकार वाहतुकीचा प्रयोग राबविण्यात आला होता. मात्र, त्यावेळी मोठ्या प्रमाणात नियोजन आणि पोलीस बंदोबस्त ठेवूनही येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला. एकेरी वाहतूक केल्यानंतर अभिनव चौकाकडे येताना विधि महाविद्यालय रस्ता आणि कर्वे रस्त्याकडून आलेल्या वाहनांना पुढे एकच रस्ता आहे. तर या दोन्ही रस्त्यावरही वाहनांची वर्दळ प्रचंड आहे. त्यामुळे महामेट्रोस जुन्या अनुभवाचा विचार करूनच आता नियोजन करावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)