पोस्टाद्वारे आता ई-चलन थेट घरी

वाहतूक विभाग घेणार पोस्ट खात्याची मदत

पुणे – वाहतूक विभागाकडून करण्यात येणाऱ्या दंडाच्या कारवाईचे ई-चलन आता थेट पोस्ट खात्यामार्फत घरी पाठवण्यात येणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेने पोस्ट खात्याची मदत घेतली असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.

शहरातील विविध भागांत वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. यासाठी चौकाचौकात “सीसीटीव्ही’ बसवण्यात आले आहेत. “सीसीटीव्ही’द्वारे कारवाई केल्यानंतर नाकाबंदीच्या माध्यमातून संबंधित वाहनावरील दंड वसूल केला जातो. सद्यस्थितीत वाहनचालकांवर कोट्यवधी रुपयांची थकबाकी झाली असून ती वसूल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी वाहतूक शाखेने आता पोस्ट खात्याची मदत घेतली आहे. चलन मिळाल्यानंतर वाहनचालकाने जवळच्या वाहतूक शाखेत 10 दिवसांच्या आता दंड भरण्याचे सांगण्यात आले आहे.

अन्यथा चालकावर मोटार वाहन न्यायालयात खटला दाखल केला जाणार असल्याच्या स्पष्ट सूचना चलन प्रिंटवर देण्यात आल्या असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले. ई-चलनाबाबत नागरिकांना काही शंका असल्यास त्यांनी जवळच्या वाहतूक शाखेत सकाळी 10 ते 5 या वेळेत भेट द्यावी, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. दंड लावण्यात आलेल्या वाहनाच्या नंबरवरून त्याची पूर्ण माहिती काढली जाणार असून त्याचे चलन करण्यात येणार आहे.

या प्रिंटवर वाहनचालकाचा पत्ता, मोडलेला नियम, त्याचा फोटो, दंडाची रक्‍कम आदी माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. यानंतर हे चलन पोस्टमनद्वारे संबंधित वाहनचालकांच्या घरी पोहोचते केले जाणार आहे. त्यामुळे संबंधित वाहनचालकाने चलन मिळाल्यानंतर दंड भरून सहकार्य करावे.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्‍त, वाहतूक शाखा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)