आता “हे’ही शक्‍य करून दाखवा (अग्रलेख)

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असल्याने राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. विशेषत: सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरु केला आहे. या प्रचाराची टॅगलाईन आता “अशक्‍य ते शक़्य’ आहे ही आहे. ही घोषणा सिध्द करण्यासाठी अनेक योजनांची उदाहरणे दिली जात आहेत. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत मोदी सरकारने अनेक अशक्‍य कामे पूर्ण केली असे सरकारला दाखवून द्यायचे आहे. मग देशातील बॅंकांना अब्जावधीना ठकवून परदेशात पलायन केलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचे अशक्‍य कामही सरकारने आता करायला हरकत नाही. गेले वर्षभर नीरव मोदी फरार आहे. नीरव मोदीला पकडण्यासाठी इंटरपोलने काही महिन्यापुर्वी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

भारत सरकारने पासपोर्ट रद्द करूनही मोदीने बिनदिक्कतपणे अनेक देशांच्या वाऱ्या केल्याचेही उघड झाले होते. काल ब्रिटनच्या एका दैनिकाने नीरव मोदी लंडनमध्ये प्रतिष्ठीत भागात तीन बेडरूमचा अलिशान फ्लॅट घेऊन आरामात राहात असल्याची बातमी प्रसारीत केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मोदीला भारतात आणण्याचा विषय समोर आला आहे. या घटनेनंतर नीरव मोदी याला भारताच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी सक्त वसुली विभागाने ब्रिटीश सरकारला केली आहे. त्यानुसार तेथील गृह विभागाच्या सचिवाने भारताची ही विनंती तेथील कोर्टात मंजुरीसाठी पाठवून दिली आहे.आता तेथील कोर्टाच्या अनुमतीशिवाय नीरवला भारतात आणणे भारताला शक्‍य नाही. ही प्रक्रिया किती काळ चालेल ते आता कोर्टाच्या प्रक्रियेवर अवलंबून असणार आहे.

एकूणच हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही. कारण या प्रकरणाबाबत मूळातच इंग्लंडने पूर्वीपासूनच नरमाईची भूमिका घेतली आहे. प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेसाठी भारताकडून इंग्लंडला देण्यात आलेले पुरावे तेथील कायद्याप्रमाणे नीरव मोदीलाही दाखविण्यात येणार असल्याने त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांमध्ये अधिकच अडचणी येण्याची शक्‍यता आहे. कारण या पुराव्यांमध्ये तपासाचे महत्वाचे दुवे आणि साक्षी असतात. हे कागदपत्र नीरव मोदीला दिल्यास, तो या कागदपत्रांचा वापर त्याच्या बाजूने खटला लढण्यासाठी करू शकतो.त्यामुळेच नीरव मोदी लंडनमध्ये राजरोसपणे हिंडत असला तरी त्याला भारतात आणण्याचे काम खूपच अवघड आहे. कारण देशातील प्रमुख बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेला सुमारे 13 हजार 500 कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीने आपणहून भारतात येण्यास नकार दिला आहे. भारतात आल्यास माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

“मॉब लिंचिंग’सारखा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे मी भारतात येऊ शकत नाही, असे नीरव मोदीने ईडीला ईमेलद्वारे सांगितले होते. नीरव मोदी शरण येण्याची शक्‍यताच नसल्याने त्याचे प्रत्यार्पण करणे हाच एक पर्याय आहे जो खूप अवघड आणि वेळखाउ आहे. मुळात नीरव मोदी एवढा मोठा घोटाळा करुन भारताबाहेर जाऊच कसा शकतो या प्रश्‍नाचे उत्तर देण्याची गरज आहे. पुर्वी प्रसिध्द झालेल्या माहितीचा विचार केला तर नीरवने केलेल्या घोटाळ्याची प्राप्तिकर विभागाला आठ महिने आधीच माहिती मिळाली होती.पण या माहितीची तपास यंत्रणांना देवाण-घेवाण करण्यासंबंधीची यंत्रणा नसल्याने त्यांनी तपास संस्थांना त्याची सूचना दिलीच नाही, असे या विभागाच्या अहवालात समोर आले आहे.खरेदी व्यवहाराबाबतचे बनावट दस्तावेज, हिऱ्यांच्या स्टॉकची भरमसाठ वाढविलेली किंमत, नातेवाइकांकडे वळविलेली रक़्कम, संशयास्पद कर्जे अशा प्रकारच्या कामात नीरव मोदी व त्याच्या सर्व कंपन्या व्यस्त असल्याचे प्राप्तिकर विभागाला हा घोटाळा बाहेर येण्याच्या आठ महिने अगोदर आढळले होते. त्याची सूचना त्यांनी त्याच वेळी सीबीआय, महसूल गुप्तहेर संचालनालय किंवा अंमलबजावणी संचालनालय यासारख्या तपास संस्थांना दिली असती, तर मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्‍सी यांना त्याच वेळी अटक करता आली असती.पण तसे झाले नाही आणि मोदी आणि त्याचे साथीदार भारताबाहेर पळून जाऊ शकले.

दुसरीकडे नीरव मोदीच्या पीएनबी बॅंकेतील घोटाळ्याची चौकशी थांबवण्यासाठी आपली बदली नागपुरला करण्यात आली असा गंभीर आरोप सीबीआयचे डीआयजी मनीष कुमार सिन्हा यांनी केला आहे. आपल्या बदलीचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सिन्हा यांनी न्यायालयाकडे केली आहे. म्हणजेच मोदीच्या कारवायांचा तपास होऊ नये किंवा त्याला भारताबाहेर पळून जाण्यास मदत व्हावी म्हणूनच काही यंत्रणा कार्यरत असतील तर त्याला भारतात आणणार तरी कसे हा एक यक्षप्रश्‍न आहे. नीरव मोदीच्या लंडनमधील वास्तव्याची बातमी प्रसिद्ध झाल्यावर सरकारला जाग येते आणि प्रत्यार्पणाच्या हालचाली सुरू होतात, हा आणखी एक़ संशयास्पद प्रकार मानावा लागेल. गेले वर्षभर सरकार आणि तपास यंत्रणा काय करीत होत्या या प्रश्‍नाचे उत्तर सरकारला द्यावे लागेल.

विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासारखे ठकसेन भारताच्या नाकावर टिच्चून लंडनमध्ये आरामात रहात आहेत. पण मोदी सरकार त्यांना भारतात आणण्यासाठी काहीच करू शकत नसेल तर “अशक्‍य ते आता शक़्य आहे,’ ही प्रचाराची टॅगलाईन भाजपने मागे घ्यायला हवी.विरोधी पक्षांनी आपल्या प्रचारात हा मुद्दा उचलून धरावा असे सरकारला वाटत नसेल तर नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्यासारख्या फरारी भामट्यांच्या मुसक्‍या आवळून त्यांना भारतात आणण्याचे अशक्‍य काम सरकारला शक्‍य करुनच दाखवावे लागेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)