आता परिवर्तनाशिवाय गत्यंतर नाही

खा.उदयनराजे भोसले : मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा – आज देशात अनेक ठिकाणी औद्योगिक क्षेत्राला प्रचंड उतरती कळा लागली आहे. बांधकाम क्षेत्रातही कठोर कायद्यानी व्यवसायाची रया घालवली आहे. शेतकऱ्यांची ध्येय धोरणाअभावी झालेली अवस्था पाहून मन विषण्ण होते. निवडणुकांपेक्षा आपले कुटुंब महत्वाचे असून कुटुंब सधन झाले तरच समाज सधन होणार आहे. देशाच्या उन्नतीसाठी अन्यायकारक कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी आता परिवर्तनाशिवाय गत्यंतर नाही, असा घणाघात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला.

उदयनराजे भोसले मित्र समुहाच्यावतीने येथील कल्याण रिसॉर्टमध्ये आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक, नगराध्यक्षा सौ माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जि. प. सदस्य अर्चना देशमुख, नगरसेवक निशांत पाटील, डी. जी. बनकर, माजी नगराध्यक्षा सौ. रंजना रावत, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, बाळासाहेब चव्हाण, विजय काळे, गीतांजली कदम, बाळासाहेब गोसावी, समृद्धी जाधव, संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, पाच वर्षानंतर निवडणुका अटळ असतात. त्यामध्ये कोणाचा विजय तर कोणाचा पराजय होत असतो.

तुम्हाला प्रश्‍न पडला असेल उदयनराजेंना का निवडून द्यायचे? गेली 25 वर्ष मी समाजकारणातून जनहिताची कामे केली. जिल्ह्याचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला. मी असे म्हणणार नाही, मला पोहोच पावती द्या. माझ्यापेक्षा अन्य कोणी जिल्ह्याचे हित अधिक चांगल्या प्रकारे साधू शकतो असे तुम्हाला वाटत असेल तर मी त्याचा जाहीर प्रचार करेन. आज देशाकडे पाहिले तर अनेक ठिकाणी औद्योगिक क्षेत्र बंद अवस्थेत आहेत. काही ठिकाणी तर अर्ध्या शिफ्टमध्ये कामगारांवर काम करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहावर गदा आली आहे. बांधकाम क्षेत्राचीही अवस्था तशीच आहे. या क्षेत्रातमध्ये केलेल्या नवीन कायद्यामुळे कामगारांची, गवंडी यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शेतीबाबत योग्य ती धोरणे न घेतल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहेत. आज परदेशातील शेतकऱ्यांकडे आणि आपल्यातील शेतकऱ्यांकडे पाहिले असता अत्यंत लाज वाटते. देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर सर्वप्रथम अन्यायकारक कायद्यांमध्ये बदल करावा लागेल, त्यासाठी सत्तांतर शिवाय गत्यंतर नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

बुधाजीराव मुळीक म्हणाले, कोल्हापूरपासून दिल्लीपर्यंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची आदरयुक्त भीती आहे. उदयनराजे ही एक व्यक्ती नव्हे तर संस्था आहे असेच म्हणावे लागेल. जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या उदयनराजे यांच्याकडे कोणतेही काम घेऊन जा, ते झाले नाही असे एकही काम नाही हा इतिहास आहे. शेतकऱ्यांच्या इरमाप्रश्‍नी त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी ते आग्रही राहिले. उदयनराजेंना
विरोध म्हणजेच छत्रपतींना विरोध, रयतेला विरोध असे ठरेल. उदयनराजेंसारख्या वंचितांना न्याय देणाऱ्या नेत्याला देशाच्या पंतप्रधानांना पडणार नाही एवढी मते देऊन त्यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सौ. माधवी कदम म्हणाल्या, उदयनराजे यांच्या माध्यमातून सातारा जिल्हामध्ये मोठी विकासकामे
झाली. त्यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही निवडणूक आपली आहे असे समजून प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे. प्रारंभी उदयनराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर बाळासाहेब चव्हाण, सौ अर्चना देशमुख, संदीप शिंदे, गीतांजली कदम, आर. वाय. जाधव, सौ. रंजना रावत, प्रल्हाद चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची गरज

निवडणुका लागल्या की प्रत्येक वेळी उदयनराजेंची दहशत आहे असा उल्लेख केला जातो. हो आहेच, का नाही? दहशत दोन प्रकारची असते एक म्हणजे कमांड आणि दुसरी म्हणजे रिमांड. मी लोकांची काम करतो म्हणून लोक मला आदराने नमस्कार करतात, त्याला कमांड म्हणतात दहशत नव्हे असे सांगून उदयनराजे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर जिल्ह्यामध्ये एकमत, एकीची गरज आहे. एकता हीच आपली ताकद आहे. सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)