आता मतदान केंद्रावर पाळणाघर 

अंध आणि दिव्यांगांसाठी वाहतुकीची व्यवस्था

मुंबई – लोकसभा निवडणूकीसाठी मतदार केंद्रावर महिला तसेच अंध व दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच नव्याने सुविधा उपलब्ध केल्या आहेत. महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, प्रत्येक मतदान केंद्रावर लहान मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था केली जाणार आहे. तर अंध आणि दिव्यांग मतदारांसाठी वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.

मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात. गेल्या निवडणुकीत मतदान केंद्रांवर सुमारे सात प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, विजेची उपलब्धता, मदत कक्ष, स्वच्छतागृहांची सुविधा या अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. यावर्षी त्यामध्ये दुपटीने वाढ करुन 15 प्रकारच्या अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

नव्याने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेतील मेडिकल किटमध्ये वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध असणार आहे. वाढत्या तापमानाची दखल घेताना मतदान केंद्रांवर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि महिलांसोबत असलेल्या लहान मुलांचा उन्हापासून बचावाकरिता सावलीसाठी मंडप टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या सहाय्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली जाणार आहे. त्यामध्ये राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट आणि गाइड विद्याथ्रयांची मदत घेतली जाईल. हे विद्यार्थी मतदार रांगेचे व्यवस्थापन करण्याबरोबरच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी सहाय्य करणार आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रावर तीन रांगा असतील. त्यामध्ये एक रांग पुरुषांसाठी, दुसरी महिलांसाठी आणि तिसरी ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांसाठी असणार आहे. रांगेतील दोन महिला मतदारांनी मतदान केल्यानंतर एका पुरुष मतदाराला मतदानासाठी आत सोडले जाईल. मात्र ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना प्राधान्य देण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)