मुंबई – मुंबईसह राज्यातील रिक्त झालेल्या 20 नगरसेवकांच्या जागेवर एकूण 10 महानगर पालिकांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. पुणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, कोल्हापूर, परभणी, चंद्रपूर या 10 महानगर पालिकांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.
याबाबतची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मात्र या पोटनिवडणुकीची तारीख अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही. मुंबईतील प्रभाग क्रमांक 28चे नगरसेवक राजपत यादव,32च्या कॉंग्रेस नगरसेविका स्टेफी किणी, 76च्या भाजप नगरसेविका केशरबेन पटेल, 81चे भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांच्या अवैध जातीच्या दाखल्याने न्यायालयाने रद्द केले होते. त्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने यावर शिक्कामोर्तब केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. मात्र कलम 34 अन्वये मुंबई महापालिकेत पोटनिवडणूक न घेता दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला नगरसेवकपदाची संधी दिली जाते. त्यानुसार, प्रभाग 28 मध्ये शंकर हुंडारे (शिवसेना), प्रभाग 32 मध्ये गीता भंडारी (शिवसेना), प्रभाग 76 मध्ये नितीन सलाग्रे (कॉंग्रेस), प्रभाग 81 मध्ये संदीप नाईक (शिवसेना) यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.