नगर –शिर्डी व नगर लोकसभा निवडणुकीचे येत्या गुरुवारी (दि.23) रोजी मतमोजणी होत असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण ठेवले होते. या प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या 42 बॅंक अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस प्रशासनाने बजावली आहे.
नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक झाली असून मतमोजणी गुरुवारी (दि.23) रोजी एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोडावून येथे होणार आहे. निकालाच्या दिवशी अधिकारी कर्मचाऱ्यांना काही अडचण निर्माण होवू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळावारी 750 अधिकारी कर्मचाऱ्यांना सहकार सभागृहात मतमोजणी प्रशिक्षण ठेवले होते. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील 21 सुक्ष्म निरीक्षक (राष्ट्रीयकृत बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी) गैरहजर राहिले होते. तर शिर्डी लोकसभा मतदार संघातील 21 अधिकारी व कर्मचारी असे एकूण 42 अधिकारी कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांना प्रशासनाने विनापरवाना गैरहजर राहून निवडणूक कामात कसूर केल्याप्रकरणी लोकप्रतिनिधी अधिनियमनुसार कारवाई का करू नये, याबाबत खुलासा मागितला आहे. हा खुलासा रविवारीपर्यंत द्यावा लागणार आहे.