न्यायालयाचा अवमान प्रकरणी राहुल गांधी यांना नोटीस

30 एप्रिलरोजी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

नवी दिल्ली – राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना केलेल्या वक्‍तव्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गांधी यांना नोटीस बजावली आहे.
गांधी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याच्या गुन्हेगारी स्वरुपाच्या आरोपावरील सुनावणी 30 एप्रिल रोजी केली जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने राफेल पुनरावलोकनवर निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून नरेंद्र मोदींवर, कोर्टानेही सांगितले चौकीदार चोर है, असे म्हणत टीका केली होती. त्यामुळे राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी, कोर्टाने जे म्हटलेले नाही तेच कोर्टाच्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करून, न्यायालयाचा अवमान केला असल्याची तक्रार करत भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने राहुल गांधींना खुलासा मागितला होता.

दरम्यान, राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात सोमवारी 22 एप्रिलला दिलगिरी व्यक्त केली. नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना मी 10 एप्रिल रोजी राफेल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल वाचला नव्हता. कोर्टाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा माझा हेतू नव्हता,असे त्यांनी प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या या प्रतिसादावर समाधानी नसल्याचे म्हणत नोटीस बजावली आहे.

राफेल प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर, अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल गांधी यांनी “चौकीदार चोर है’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यावर भाजपने आक्षेप घेतला होता. राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दिलगिरी व्यक्त करत आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या वातावरणात जोशात विधान केले होते. विरोधकांनी आपल्या वक्‍तव्याचा विपर्यास केला आणि “सुप्रीम कोर्टाने चौकीदार चोर है’ असे राहुल गांधींनी म्हटले असल्याचे विरोधकांनी पसरवले असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते.
परंतु राहुल गांधी यांच्या या प्रतिसादावर सर्वोच्च न्यायालयाने समाधानी नसल्याचे म्हणत नोटीस बजावली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here