गुन्हा दाखल करण्याची निवडणूक विभागाची तंबी
पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आता तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मात्र, उमेदवारांनी आपल्या प्रचारार्थ केलेल्या खर्चाचा तपशील निवडणूक विभागाकडे सादर न केल्यामुळे चार उमेदवारांना नोटीसा पाठविण्यात आल्या असून 48 तासांत खर्च सादर न केल्यास गुन्हा दाखल करण्याची तंबी देण्यात आली आहे. नोटीसा पाठविण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे पंढरीनाथ पाटील, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश महाडीक यांच्यासह डॉ. सोमनाथ पोळ व बाळकृष्ण घरत या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
मावळ लोकसभा निवडणूकीच्या आखाड्यात या निवडणुकीत 21 उमेदवार उतरले आहेत. निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदान होईपर्यंत प्रचारात केलेला खर्च नियमानुसार निवडणूक विभागाला सादर करावा लागतो. एका उमेदवाराला जास्तीत जास्त 70 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगाने ठरवून दिली आहे. त्यानुसार ठराविक अंतराने उमेदवाराने केलेला खर्च सादर करण्याचे बंधन आहे. 21 पैकी 17 उमेदवारांनीच आपला खर्च सादर केला आहे. 4 उमेदवारांनी दुसऱ्या टप्प्यातही खर्च सादर न केल्याने आयोगाने त्यांना पुन्हा नोटीस काढून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
खर्च सादर न केलेल्या उमेदवारांना 48 तासांत खर्च सादर करण्याची सक्ती करण्यात आली असून निवडणूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या उमेदवारांना निवडणुकीसाठी दिलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली.