औरंगाबाद खंडपीठाची मंत्री गिरीश बापट यांना नोटीस

औरंगाबाद : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. स्वस्त धान्य दुकानाच्या संबंधित एका प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर आता खंडपीठाने गिरीश बापट यांना नोटीस बजावली आहे.

बीड गेवराई तालुक्‍यातील संगम जळगाव गावातील निलंबित रेशन दुकान पुन्हा दुकानदाराला बहाल केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. संगम जळगावमध्ये रवींद्र चव्हाण यांचे रेशन दुकान आहे. या दुकानाच्या विरोधात प्रभाकर नागरे आणि मनोज नागरे यांनी तक्रार केली होती. दुकान मालक स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकतो आणि चढ्या भावाने देतो. यासंदर्भात तहसीलदारांनी चौकशी केली आणि संबंधित दुकानदाराचे रेशन दुकानाचा परवाना निलंबित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर सदरील दुकानदाराने उपायुक्तांकडे धाव घेतली. उपायुक्तांनी देखील दुकानाचा परवाना निलंबित केल्याचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर राज्याचे पुरवठा राज्यमंत्र्यांकडे सदरील दुकानदाराने अपील केले. हे अपील राज्यमंत्र्यांनी देखील फेटाळले. त्यानंतर दुकानदार यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली, खरंतर ही पुनर्विचार याचिका देखील राज्यमंत्र्यांकडे जायला हवी होती मात्र ती गिरीश बापट यांच्याकडे आली.

यावर बापट यांनी निर्णय घेत सदरील दुकानदाराला त्याचा निलंबित केलेला परवाना रद्द करून पुन्हा रेशन दुकान चालू करण्याची परवानगी दिली. याच विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती. त्यानंतर खंडपीठाने सदरील प्रकरणाबाबत मंत्री गिरीश बापट यांना नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)