नीरा-देवघरचे पाणी देण्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना

फलटण  – नीरा- देवघर धरणाचे पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे धोम- बलकवडी प्रकल्पाच्या कालव्यात टाकून नीरा- देवघरच्या लाभक्षेत्रात देण्याच्या मागणीबाबत सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अन्सारी यांनी अधिक्षक अभियंत्यांना दिल्या असून त्याबाबतचा अहवाल सहा महिन्यांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नीरा-देवघर प्रकल्पाबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात बुधवार दि. 10 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता आयोजित बैठकीत सभापती रामराजे आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, नीरा-देवघरचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल उपस्थित होते.

नीरा- देवघर या 12.986 टीएमसी क्षमतेच्या धरणाचे पाणी भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस या तालुक्‍यांतील सुमारे 43 हजार 50 हेक्‍टर क्षेत्राला सिंचनासाठी व या तालुक्‍यात पिण्यासाठी वापरण्याची तरतूद प्रकल्प अहवालात असून त्यासाठी कालवे आणि चार उपसा सिंचन योजनांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, बेनवडी उपसा सिंचन योजनेशिवाय गावडेवाडी, शेखमीरवाडी, वाघोशी या तीन उपसासिंचन योजना आणि कालव्याची कामे अपूर्ण असल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होऊनही ते लाभक्षेत्रात देण्यात असलेल्या अडचणीबाबत मार्ग काढण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांनी या बैठकीत गावडेवाडी उपसासिंचन योजना पूर्ण करुन त्याद्वारे नीरा- देवघरचे पाणी धोम- बलकवडी प्रकल्पाच्या कालव्यात टाकून लाभक्षेत्राला देण्याची मागणी केली.

या मागणीला दुजोरा देवून सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले असून या मागणीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही तत्वत: संमती दिली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीबाबत स्पष्ट निर्देश देण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. धोम-बलकवडीच्या कालव्यासाठी 14 गावांचे क्षेत्र गेले आहे, त्यांच्यासाठी जलनियोजन तरतूद नसली तरी कृष्णा पाणी वाटप लवाद- 2 चे अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असल्याने या वाढीव पाण्याची तरतूद या 14 गावांसाठी करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा, अशी सूचना या बैठकीत रामराजे यांनी केलीे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)