नोटाबंदीःफसलेली “क्रांती’ (भाग १)

नोटाबंदी हे एक “क्रांतिकारक पाऊल’ असल्याचे 2016 च्या अखेरीस देशाला सांगितले गेले. जसजसे त्याचे परिणाम दिसू लागले, तसतसे नोटाबंदी करण्यामागची वेगवेगळी कारणे सांगितली जाऊ लागली. दहशतवादी, नक्षलवाद्यांना होणारा अर्थपुरवठा रोखणे, काळा पैसा बाद करणे, कॅशलेस अर्थव्यवस्थेची सुरुवात करणे, बनावट नोटांचा सुळसुळाट रोखणे यापैकी एकही हेतू सफल झाला नाही, हेच रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे आणि पारदर्शकता प्रिय असणाऱ्यांनी लोकांना पडलेल्या प्रश्‍नांची तर्कसुसंगत उत्तरे द्यायला हवीत. 

बंदी घातलेल्या जवळजवळ सर्व नोटा परत आल्या, तर काळा पैसा गेला कुठे? हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनातून बाद केलेल्या 99.3 टक्के नोटा परत आल्याचे रिझर्व्ह बॅंकेने सांगितले आहे. नोटाबंदी करताना देशात हजार आणि पाचशेच्या नोटांच्या स्वरूपात 15 लाख 41 हजार कोटी रुपयांचे चलन अस्तित्वात होते. यापैकी 15 लाख 31 हजार कोटी रुपये मूल्याच्या नोटा परत आल्या आहेत. केवळ दहा हजार कोटी रुपयेच परत आले नाहीत. म्हणजेच, काळ्या पैशाला अंकुश लावण्याचा दावा सफल झाला नाही, हे स्पष्टपणे दिसते. कारण, नोटाबंदीनंतर काळा पैसा “रद्दी’ होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले होते.

काहीजण गंगेत नोटा सोडून देत आहेत, असाही दावा त्यांनी केला होता. मग परत आलेल्या एवढ्या सगळ्या नोटा आल्या कुठून? सगळी “रद्दी’ रिझर्व्ह बॅंकेतच जमा झाली, असेच म्हणायला हवे. नोटाबंदी जाहीर केल्यानंतर दोन आठवड्यांनी निर्णयाचे समर्थन करताना ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, ईशान्येकडील राज्ये आणि काश्‍मीरमधील दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी वापरण्यात येणारे चार ते पाच लाख कोटी रुपये चलनातून बाहेर काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. तेही चार ते पाच लाख कोटी आता बॅंकिंग प्रणालीत परत आले.

अर्थात, नोटाबंदी जाहीर केल्यानंतर त्यामागील कारणे जवळजवळ रोज वेगवेगळी सांगितली जाऊ लागली होती. कधी कॅशलेस अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट सांगितले जात होते, तर कधी करप्रणालीचा विस्तार वाढविण्याचे कारण सांगितले जाऊ लागले. गावेच्या गावे कशी कॅशलेस झाली, तिथले भाजीवालेही आता स्वाइप मशीन कसे वापरतात, याची दृश्‍ये दूरचित्रवाणीवरून सतत दाखवली गेली.

संतोष घारे 
सनदी लेखापाल 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)