नोटाबंदीः फसलेली “क्रांती’ (भाग १)

नोटाबंदी हे एक “क्रांतिकारक पाऊल’ असल्याचे 2016 च्या अखेरीस देशाला सांगितले गेले. जसजसे त्याचे परिणाम दिसू लागले, तसतसे नोटाबंदी करण्यामागची वेगवेगळी कारणे सांगितली जाऊ लागली. दहशतवादी, नक्षलवाद्यांना होणारा अर्थपुरवठा रोखणे, काळा पैसा बाद करणे, कॅशलेस अर्थव्यवस्थेची सुरुवात करणे, बनावट नोटांचा सुळसुळाट रोखणे यापैकी एकही हेतू सफल झाला नाही, हेच रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे आणि पारदर्शकता प्रिय असणाऱ्यांनी लोकांना पडलेल्या प्रश्‍नांची तर्कसुसंगत उत्तरे द्यायला हवीत. 

“मी देशवासीयांकडून फक्त पन्नास दिवस मागतो आहे. फक्त पन्नास दिवस. तीस डिसेंबरपर्यंत मला संधी द्या. जर त्यानंतर काही कमतरता राहिली, काही चूक निघाली, माझा हेतू चुकीचा असल्याचं स्पष्ट झालं, तर ज्या चौकात तुम्ही मला उभं कराल, तिथं उभं राहून देश जी सांगेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे…’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चारलेले हे शब्द आहेत. आठ नोव्हेंबर 2016 रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाच दिवसांनी गोव्याच्या विमानतळाचे भूमिपूजन करताना उच्चारलेले हे शब्द. त्यानंतर एक वर्ष आणि नऊ महिने उलटून गेले असून, आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्‍न आहे. नोटाबंदी जाहीर करताना केलेल्या दाव्यांमधील हवा निघून कशी गेली?

या देशात एक नवी “क्रांती’ होत आहे, हेही पंतप्रधानांचेच शब्द. त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आणि पक्षातील लोकसुद्धा या निर्णयाला “क्रांतिकारी निर्णय’ असेच संबोधत होती. नोटाबंदी जाहीर करून देशाला नेमका कोणता फायदा झाला? नोटाबंदीमुळे नेमके नुकसान किती झाले? फायदा झालाच असेल थोडाबहुत, तर नुकसानीशी त्याचे गुणोत्तर काय? जमा झालेल्या जुन्या नोटांची आकडेवारी रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केल्यापासून आतापावेतो नोटाबंदी यशस्वी झाल्याबद्दल सत्ताधारी पक्षाकडून अद्याप कोणताही ठोस दावा करण्यात आलेला नाही.

आठ नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी जाहीर करताना पंतप्रधानांनी काळ्या पैशाला अंकुश लावण्याबरोबरच दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यापर्यंत अनेक हेतू सांगितले होते. त्यातला नेमका कोणता हेतू किती टक्के सफल झाला, असा प्रश्‍न आता सर्वांना पडला आहे.

संतोष घारे 
सनदी लेखापाल 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)