टिपण : सत्ता स्थापनेसाठीच भाजपा-सेनेची कमालीची अगतिकता

शेखर कानेटकर

प्रादेशिक मित्र पक्षांना येनकेनप्रकारे वश करणे, विरोधकांच्या मागे चौकशांचे शुक्‍लकाष्ट, राममंदिराचा आग्रह, सवर्णांना दहा टक्के आरक्षण, शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांना हात न घातला, दरमहा पाचशे रुपयांची तोकडी मदत, मजुरांना पेन्शनची भुरळ, पुरोहितांना मानधन या साऱ्या गोष्टी सत्ता कायम राखण्यासाठी चाललेल्या नव्या युक्‍त्या आहेत. पुलवामाचा बदला घेण्यासाठी पुन्हा मोदींनाच निवडून देण्याचे आव्हान करणारे समाज माध्यमांवरील भावनात्मक संदेशही सर्व सत्ताप्राप्तीसाठी चाललेले अभियानच आहे. कितीही “पार्टी विथ ए डिफरन्स’ म्हटले तरी सत्तेसाठी चालू असलेली ही अगतिकताच आहे.

आम्ही सेवाभावी आहोत, कॉंग्रेससारखे सत्ताभोगी नाही,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच लोकसभेत ठणकावून सांगितले होते. पण प्रत्यक्षात 2014 मध्ये मिळालेली सत्ता टिकविण्यासाठी भारतीय जनता पक्ष किती अगतिक झाला आहे, असे त्याच्या ताज्या धोरणावरून दिसते आहे. आधी बिहारमधील संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती पक्ष आणि आता शिवसेना यांच्याबरोबर युती करताना भाजपने जी पडती भूमिका घेतली आहे, ही या अगतिकतेची ताजी उदाहरणे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल, शेतकऱ्यांमधील असंतोष, विक्रमी बेरोजगारी, पोकळ घोषणा, आश्‍वासनपूर्तीचा अभाव यामुळे जनतेच्या मोठ्या वर्गात नाराजी तीव्र आहे, हे ध्यानात आल्याने नि स्वबळावर पुन्हा सत्तेची ऊब मिळणार नाही याचा अंदाज आल्याने भाजप नेतृत्वाची दुखावलेले मित्र पुन्हा वश करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काहीच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे अमित शहा आम्ही स्वबळावर 300 जागा जिंकण्याची भाषा, दर्पोक्ती करीत होते. पण आता मात्र त्यांनी नमते घेण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एन.डी.ए.) नावाखाली भाजपने 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली. पण स्वतःला 282 एवढ्या स्वबळावर जागा मिळाल्यावर भाजपने मित्रपक्षांना सतत दुय्यम व उपमर्द करणारी वागणूक दिली. मंत्रिपदाचे तुकडे त्यांना जरूर दिले, पण महत्त्व शून्य दिले. पण आता परिस्थिती एवढी बदलली आहे की मित्रपक्ष म्हणतील ते मान्य करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. निव्वळ सत्ता टिकविण्यासाठी! बिहारमध्ये 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्यात कपात करून भाजपने नीतिशकुमार यांच्या पक्षाशी समझोता केला आहे. बिहारमध्येच रामविलास पास्वान यांच्या छोट्या पक्षालाही सहा जागा बहाल केल्या गेल्या आहेत.

शिवाय स्वतः पास्वान यांना राज्यसभेच्या सुरक्षित जागेचा नजराणा दिला गेला आहेच. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील 48 पैकी 43 जागा जिंकण्याचा दावा केला होता. तोही स्वबळावर. शिवसेनेला “पटक देंगे’ची भाषाही केली होती. राज्यातील शिवसेना मंत्रिपदे ठेवली होती. पण बिन महत्त्वपूर्ण खाती देऊन दुय्यम वागणूक दिली. पण शेवटी युती होण्यासाठी भाजप किती आसुसलेला होता. शिवसेनेने, तिच्या शीर्षस्थ नेत्याने भाजपच्या सर्वोच्च नेत्याला “चौकीदार चोर है’ असे म्हटले. पक्षाध्यक्षांची अफझलखान म्हणून संभावना केली, राम मंदिरासाठी कुंभकर्णाला जागे करणार म्हटले. अफझलखानाच्या फौजांशी सामना करण्याची तयारी दर्शविली. हे सगळे वर्मी लागणारे वार झेलूनही भाजपने युती केलीच ना? ती कशासाठी आहे. सेवाभावासाठी की सत्तालोभीपणासाठी? शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनला कडवा विरोध केला.

समृद्धी मार्गालाही प्रतिकार केला. नाणार प्रकल्पातही खो घालण्यासाठी आटापिटा केला. पण हे सगळे सहन करून शेवटी गळ्यात गळे घातले गेलेच. आता एवढे रामायण झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पाची जागा बदलण्याचे आश्‍वासन दिले आहे. हे निवडणुकीनंतर प्रत्यक्षात किती येईल ते पहायचे. नाही तर शेवटी तो जुमलाच ठरायचा. शिवसेनेबरोबर युती करायला भाजप एवढी उतावीळ झाली होती की त्यांनी शिवसेनेला लोकसभेच्या 3 जास्त जागा दिल्याच. पण गेल्यावेळपेक्षा विधानसभेच्या जवळपास 115 जागांवरही पाणी सोडले आहे.

2014 मध्ये भाजपने विधानसभेच्या स्वबळावर 260 जागा लढविल्या होत्या. आता निम्म्या जागा कमी लढविणार असल्याने तेवढ्या कार्यकर्ते, नेत्यांची नाराजी ओढवून घेणे पक्षाने पसंत केले आहे. तेलगू देसम, आसाम गण परिषद, स्वाभिमानी पक्ष, नागा पीपल्स फ्रंट, गोरखा जनमुक्ती मोर्चा, पीडीपी आदी छोट्या-मोठ्या पक्षांनी भाजपची साथ आधीच सोडली आहे. त्यात जुन्या व आक्रमक पक्षाची भर नको म्हणून भाजपने बदलत्या परिस्थितीचे भान ओळखून शिवसेनेशी जमवून घेऊन निदान महाराष्ट्रापुरती बाजू बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.

अर्थात शिवसेनेनेही गेली साडेचार वर्षे केलेली झोंबरी टीका, शाब्दिक वार विसरून कमळाच्या गळ्यात गळे घातले आहेत. अर्थात तेही सत्तेत राहण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठीच. एवढे दिवस “चौकीदार चोर’ होता आता “चौकीदार थोर’ आहे, असे ऐकायची सवय लोकांना करायला लागेल, इतकेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)