टिपण : सत्ताधाऱ्यांना आता धसका नोटाचा

– शेखर कानेटकर

नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात इव्हीएममार्फतच झाल्या. त्यात तीन राज्यांत कॉंग्रेसला सत्ता मिळाली; भाजपचा पराभव झाला. यावेळी मात्र कोणी इव्हीएमबाबत आक्षेप घेतला नाही. कॉंग्रेसच्या यशाचे श्रेय इव्हीएमला दिले नाही. त्यामुळे भविष्यात इव्हीएमचा बाऊ केला जाण्याची शक्‍यता कमीच आहे. तूर्त इव्हीएमबद्दलचा ओरडा कमी झाला आहे. पण इव्हीएममधील “उपलब्ध उमेदवारांपैकी कोणीही योग्य नाही’ (नोटा) या पर्यायाबद्दल ओरडा सुरू झाला आहे. त्याचा धसका सत्ताधारी आणि विरोधक घेताना दिसत आहे.

मागील लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या बहुतेक विधानसभा व अन्य स्थानिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला एका पाठोपाठ भरघोस यश मिळू लागल्यावर भाजप विरोधकांनी इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा (इव्हीएम) धसका घेतला होता. “इव्हीएम’मध्ये फेरफार केले जात असल्याचा आक्षेपही मोठ्या प्रमाणात घेतला गेला. पण निवडणूक आयोगाने असा फेरफार करता येत नसल्याचा निर्वाळा दिला. त्याने विरोधकांचे काही समाधान झाले नाही आणि त्यांनी पूर्वीप्रमाणे मतपत्रिकांद्वारेच मतदान घेण्याची मागणी केली. पण ती पूर्ण होण्याची शक्‍यता कमीच होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सत्ताधारी भाजप उमेदवारांचा फार थोड्या फरकाने पराभव झाला आणि “नोटा’च्या पर्यायाला त्यापेक्षा जास्त मते पडली. त्यामुळे “नोटा’नेच आपला घात केल्याची भाजप नेत्यांची धारणा झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर “नोटा’ या पर्यायाचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजप नेते करू लागले आहेत.

कॉंग्रेसची राजवट असताना प्रथम इव्हीएम आली तेव्हा भाजप नेत्या त्याच्या अचूकतेबद्दल शंका घेतली होती. न्यायालयाचे दार ठोठावले होते. पुस्तिकाही प्रकाशित केल्या होत्या. पण पक्षाची विजयी घोडदौड सुरू झाल्यावर भाजप “इव्हीएम फ्रेंडली’ झाला तर विरोधकांनी फेरफारीचा ओरडा सुरू केला. आता 5 राज्यांच्या निवडणुकीत “नोटा’ विजयाच्या आड आल्याने भाजपने “नोटा’ विरुद्ध आवाज वाढवायला सुरुवात केली आहे.

मध्य प्रदेशात मतदान केलेल्या नागरिकांपैकी 1.5 टक्के जणांनी, राजस्थानात 1.3 टक्के लोकांनी तर छत्तीसगडमध्ये सर्वात जास्त 2.1 मतदारांनी “नोटा’ पर्यायाचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. “नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षा इतर छोट्या पाच पक्षांची मतेही कमी असल्याचे सांगितले जाते.

मध्य प्रदेशातील किमान बाराजणांवर “नोटा’च्या वापरामुळे भाजपला विजय मिळाला नाही. तसे झाले नसते तर भाजप बहुमताच्या पुढे गेला असता, असा दावाकरण्यात येत आहे. अनेक मतदारसंघात भाजपचा साडेतीनशे ते सातशे मतांनी पराभव झाला. तेथे “नोटा’चा पर्याय वापरलेल्यांची संख्या एक ते तीन हजार आहे, असेही सांगितले जाते. मध्य प्रदेशात एकूण 5 लाख 42 हजार 295 मतदारांनी कोणताच पर्याय (उमेदवार) मान्य नसल्याचा कौल दिला आहे.

या पार्श्‍वभूमीवर “नोटा’च्या पर्यायाला आक्षेप घेतला जाताना दिसतो. “नोटा हा लोकशाहीतील अयोग्य पर्याय आहे. त्यामुळे अयोग्य उमेदवाराचा लाभ होतो व योग्य उमेदवाराचा तोटा होतो,’ असे मधंतरी सरसंघचालक म्हणाल्याचे आठवते. त्याचीच री आता पराभवानंतर भाजप पदाधिकाऱ्यांकडून ओढली जाताना दिसते.

“नोटा’चा वापर करणारा मतदार कोणताच उमेदवार योग्य न वाटल्याने यंत्रातील त्या सुविधेचा वापर करत असतो. म्हणजे भाजपचा उमेदवार त्याला पसंत नाही, हे उघड आहे. त्यामुळे “नोटा’ला पडणारी सर्व मते जणू भाजपचीच होती, असे गृहीत धरणे कितपत सयुक्तिक ठरेल? रिंगणातील उमेदवार मान्य/पसंत असते तर त्याने “नोटा’चा वापर केलाच नसता. घटकाभर असे गृहीत धरले की “नोटा’चा पर्याय उपलब्ध नाही. तर मग कोणताच उमेदवार पसंत नसेल तर मतदार मतदान करायला बाहेर पडणारच नाही. “नोटा’मुळे तो मतदान केंद्रावर तरी येतो.

एकीकडे नागरिकांना मतदान सक्‍तीचे करण्याची भाषा करायची आणि आता “नोटा’चा धसका घ्यायचा हे विसंगत वाटते.
लोकशाहीत पराभव हा उमदेपणाने, नम्रतेने स्वीकारायला हवा. पण दुर्दैवाने भारतात तसे होत नाही. यापूर्वी पराभवानंतर इव्हीएमवर आक्षेप घेतले गेले. पुन्हा मतपत्रिकाच वापरण्याची मागणी झाली. त्यासाठी प्रगत राष्ट्रांचे दाखलेही देण्यात आले.

पण मतपत्रिकांचा वापर होत असतानाच्या काळात इंदिरा गांधी यांनी दणदणीत विजय मिळविला तेव्हा हा विजय “बाईंचा नाही, गाईचा नाही तर शाईचा आहे,’ असेही शोध लावले गेले होतेच. “बाई म्हणजे इंदिराजी, गाय-वासरू हे कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह आणि दुसऱ्या चिन्हावर मारलेल्या शिक्‍क्‍याची शाही पसरत पसरत गाय-वासरू चिन्हावर येऊन थबकते.)
कोणत्याही पक्षाचा पराभव झाला की खापर फोडण्यासाठी निमित्त शोधण्याची परंपरा आपल्याकडे आहे. यावेळी आता “नोटा’चे निमित्त झाले आहे, एवढेच. आता सत्ताधाऱ्यांनी हा पर्यायच काढून टाकला नाही म्हणजे मिळविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)