ग्रेट पुस्तक : नॉट विदाउट माय डॉटर – बेट्टी महमुदी

अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार..

आज मी एका अशा पुस्तकाची ओळख करून देणार आहे, ज्यामधील नायिकेला आधुनिक “हिरकणी” म्हटले तरी हरकत नाही. एखाद्या शूर स्त्रीला अशी उपाधी निश्‍चितच गौरवास्पद आहे. तर आज मी “नॉट विदाउट माय डॉटर “या पुस्तकाचा अभिप्राय थोडक्‍यात तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करते आहे. या पुस्तकाची मूळ लेखिका अमेरिकेच्या बेट्टी महमुदी या असून विल्यम हॉफर हे सहलेखक आहेत. या इंग्रजी पुस्तकाचा मूळ अनुवाद सौ.लीना सोहोनी यांनी केला असून या पुस्तकाचे प्रकाशन मेहता पब्लिकेशन हाऊस यांनी केले आहे.

सुरवात होते एका सुखी अन्‌ उच्चशिक्षित कुटुंबापासून. बेट्टी मेहमुदी या त्यांच्या मुलीला घेऊन पती डॉ.सय्यद बोझोर्ग महमुदी उर्फ मुडी याच्या आग्रहाखातर फक्त पंधरा दिवसांसाठी त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याच्या निमित्ताने इराणला पोहचतात. तेथील गलिच्छ वातावरण अन्‌ स्रियांना देण्यात येणारी अगदीच हीन वागणूक पाहून बेट्टी अन त्यांची मुलगी अतिशय नाराज होतात. पण इराणमध्ये फक्त पंधरा दिवसांचाच मुक्काम असल्यामुळे त्या हे सहन करण्याचे ठरवतात. मुडीचे कुटुंब त्यांचे स्वागत एका जिवंत बकरीच्या रक्ताने करतात. ते ओलांडून त्यांनी आत यावे अशी तेथील पद्धत पाहून बेट्टी अन त्यांची मुलगी दोघी घाबरून जातात. तेथील रूढी परंपरा स्त्रीला नेहमीच गुलाम म्हणून वागवणाऱ्या होत्या.

मुडीच्या घरी बेट्टी यांना अगदीच हीन वागणूक दिली जाते. प्रचंड प्रमाणात घरात असलेली घाण, स्वयंपाक घरात असलेले झुरळांचे अन्‌ कीटकांचे साम्राज्य, अन्नामध्ये असलेल्या अळ्या, कुबट वासाची खोली अन्‌ घाणेरडे अंथरूण पांघरूण. बाहेर निघताना केससुद्धा दृष्टीस न पडावा म्हणून मोठा जाड, गलिच्छ बुरखा घालावा लागत असे. आणि विशेष म्हणजे ज्या मुडीला या घाण गोष्टींचा तिटकारा होता, तो अचानक नाहीसा झाला. स्वत: एक डॉक्‍टर असूनसुद्धा या सगळ्या गोष्टींकडे तो दुर्लक्ष करीत असे. शेवटी पंधरा दिवस संपतात अन मुडीचा खरा चेहरा समोर येतो. त्याचा त्यांना कायम तेथेच ठेवून घेण्याचा विचार लक्षात असतो. बेट्टी यांचे सगळे बाहेरचे संपर्क तोडण्यात येतात, मुडी अन्‌ त्याचे नातेवाईक यांच्याकडून दोघींचा छळ चालू होतो, कोणाशी बोलणे नाही, बाहेर जायचे नाही. रोज मार, घाणीचे साम्राज्य, तेथील भाषा आत्मसात नाही, मुलीला तिच्यापासून दूर केले जाते, पळून जाण्याचे प्रयत्न अनेक वेळा फसतात. सात आठ वर्षे सोबत राहिलेला प्रेमळ नवरा अन्‌ प्रेमळ पिता मुडी अचानक इतका बदलतो की, त्या दोघी हतबल होतात.

शेवटी तिथून मोहताबसहित पळण्याचा बेट्टी यांचा प्रयत्न चालू होतो.लहान मुलीला घेऊन पळण्याचा प्रवास अत्यंत धाडसाचा, जीवघेणा होता. तरीही तो प्रयत्न त्या कसा पूर्ण करतात; पुढे मुडीचे काय होते, आज ते कोणत्या परिस्थितीत राहत आहेत हे सर्व तुम्ही पुस्तकात वाचू शकाल. स्त्री अबला नसून सबला आहे, ती प्रेमळ माता हिरकणी आहे, ती कर्तव्यदक्ष पत्नी आहे, तशीच प्रसंगी अन्यायाला लाथाडणारी दुर्गा आहे. अतिशय धाडसी स्त्रीची ही सत्यकथा आहे. प्रत्येक क्षण श्‍वास रोखून धरणारी ही खरीखुरी सत्यघटना नक्कीच तुम्हाला संकटाशी सामना करण्याची हिम्मत देते. हे प्रेरणादायी पुस्तक नक्की वाचा. लवकरच नवीन पुस्तकांचा अभिप्राय घेऊन तुम्हाला भेटेनच. धन्यवाद.

– मनीषा संदीप

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)