भाषा-भाषा : इंग्रजी नव्हे, इंग्रजीवाद हाच आहे खरा आजार   

देविदास देशपांडे 
इंग्रजी भाषा हा एक रोग असून ब्रिटिश राज्यकर्ते हा देश सोडताना हा आजार आपल्या मागे सोडून गेले आहेत, असे विधान देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले होते. नायडू यांनी अशा रुग्णांची तपासणी व्यवस्थित केली आहे; परंतु त्यांचे निदान चुकले आहे. आजच्या घडीला इंग्रजी भाषा हा आजार नाही तर इंग्रजीवादी लोकांची वाढती संख्या हा खरा आजार आहे. 
उपराष्ट्रपती नायडू यांचा इंग्रजीवरील हल्ला अनपेक्षित आणि अनाठायी नाही. केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे प्रवक्‍ते म्हणून सार्वजनिक कार्यक्रमात आवर्जून हिंदी भाषेत बोलताना लोकांनी त्यांना अनेकदा पाहिलेले आहे. त्यांच्या भाषेची आणि बोलण्याच्या लकबीची कितीही थट्टा झाली तरी त्यांनी घेतला वसा कधी सोडला नाही. त्यामुळे हिंदी आणि मातृभाषा या दोन्हींबद्दल आदर दाखविण्याचा त्यांनी केलेला उपदेश त्यांच्या एकूण वर्तनाला साजेसा आहे. हिंदी ही भारतातील सामाजिक-राजकीय आणि भाषिक ऐक्‍याचे प्रतीक असल्याचेही नायडू यांनी सांगितले आहे. आपल्या देशात जर इंग्रजी बोलता येत नसेल तर तो अडाणी किंवा इंग्रजी भाषा बोलणे म्हणजे स्मार्टपणा, जो इंग्रजीत बोलतो तो ज्ञानी, असा एक समज निर्माण झाला आहे, असेही निरीक्षणास त्यांनी नोंदवले. मात्र, इंग्रजीच्या मागे लागलेल्या लोकांची संख्या आपल्याकडे भीती वाटण्याइतपत झपाट्याने वाढली आहे. त्यांच्या या धावण्यामागे काय कारण असावे? असे आहेत काही युक्‍तिवाद…
1. इंग्रजी ही अतिशय समृद्ध भाषा आहे. 
2. जागतिक पातळीवर जायचे असेल तर इंग्रजी आवश्‍यक भाषा आहे. 
3. उत्तमोत्तम साहित्य इंग्रजी भाषेत वाचावयास मिळते. 
4. जागतिक व्यासपीठावर स्पर्धेत भाग घ्यायचा झाल्यास जगाची ही भाषा आत्मसात केली नाही, तर कसे भागणार? 
5. विज्ञान आणि तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी तर इंग्रजी अपरिहार्य आहे 
पाश्‍चात्य साम्राज्यवादी देशांमधील ऐतिहासिक साठमारीमुळे इंग्रजी जगभर पसरली. ही साठमारी आजही चालू आहे. त्यातूनच ही भाषा जागतिक संवादाची भाषा झाली आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. अनेक शतकांचा वसाहतवाद, नववसाहतवाद, शीतयुद्धादरम्यानचा विस्तारवाद आणि आताच्या जागतिकीकरणाच्या काळात पाश्‍चिमात्य देशांनी आपली मूल्ये अन्य समाजावर लादण्याचे प्रयत्न केले. दुसऱ्या महायुद्धापर्यंत ब्रिटिशांनी आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जगावर प्रभाव गाजवला आहे. या दोन्ही देशांची भाषा इंग्रजी आहे हा योगायोग! आणि त्यामुळे काय झाले, की इंग्रजी ही विशिष्ट सांस्कृतिक ओळख हरवून बसलेली भाषा बनली आहे. एक काळ होता, की इंग्रजी साहित्य म्हटले की शेक्‍सपिअर, वर्डस्वर्थ आणि डिकन्स ही नावे आठवायची. आता इंग्रजी लेखकांमध्ये हारुकी मुराकामी, सलमान रश्‍दी आणि पाऊलो कोएलो अशी सर्व नावे येतात. त्यामुळे आधीच आक्रसलेले जग एकसमान दुव्याने जोडले जात आहे.
सुमारे 500 वर्षांपूर्वी जगात इंग्रजी बोलणाऱ्यांची संख्या केवळ 50 ते 70 लाख एवढी होती. आज विविध खंडांमध्ये पसरलेल्या इंग्रजी भाषकांची संख्या 1.8 अब्ज एवढी आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ब्रिटिश ही जगाची महासत्ता होती. इंग्रजी शिकविणाऱ्या शाळा उघडणे आणि स्थानिक लोकांना पाश्‍चिमात्य संस्कृती शिकवून त्यांना “आधुनिक’ बनवणे, ही वसाहतवादाची ठरलेली पद्धत होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यात असलेल्या बहुतेक देशांमध्ये (घाना आणि दक्षिण अफ्रिका) आज इंग्रजी ही अधिकृत भाषा आहे, याचे कारण हेच आहे. आज इंग्रजी ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. उच्च शिक्षणाच्या कोणत्याही प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत शिकण्यासाठी इंग्रजी आवश्‍यक बनली आहे आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहण्यासाठी किंवा काम करण्यासाठी ती एक गरज बनली आहे. परंतु यामुळेच इंग्रजीने एका नवीन चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जन्म दिला असून ती श्रेष्ठत्वाचे एक गमक बनली आहे.
नायडूंनी ज्या आजाराकडे निर्देश केला आहे तो हाच आजार आहे. वसाहतवादी मानसिकता आपल्यावर आजही सत्ता गाजवत आहे. हिंदी ही भलेही भारताचे राजभाषा असेल, मात्र वास्तवात स्वतःचे स्थान मिळवण्यासाठी ती आजही धडपड करत आहे. हिंदीच नव्हे तर अन्य भारतीय भाषाही कोपऱ्यात ढकलल्या जात आहेत.
भारतात तमिळ, तेलगू, बंगाली आणि मल्याळम अशा काही भाषांचा अपवाद सोडला तर बहुतेक भाषांना अजूनही अस्मिता बोध नाही. आपल्याकडे मराठीच्या प्रतिष्ठापनेसाठी अधूनमधून आंदोलने होतात, तशी ती कर्नाटक आणि आसामसारख्या राज्यांमध्ये होतात. मात्र, त्यात अन्य भाषिकांना लक्ष्य करण्याचे प्रमाण जास्त होते. त्यातही हिंदी भाषकच त्यात भरडले जातात. या भागातील लोकांचेही आपापल्या भाषांवर प्रेम आहे, मात्र याचा अर्थ ते वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडले आहेत असा होत नाही. म्हणूनच त्यांना हिंदीपेक्षा इंग्रजी आपली वाटते, जवळची वाटते.
दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर महात्मा गांधी यांनी 1909 मध्ये “हिंद स्वराज’ हे पुस्तक लिहिले होते. यात त्यांनी अन्य मुद्द्यांसोबतच स्वतंत्र भारताच्या भाषेबाबतही विचार व्यक्‍त केले होते. महात्मा गांधी म्हणतात, “लोकांना इंग्रजी शिकवणे म्हणजे त्यांना गुलाम बनवणे आहे. मेकॉलेने शिक्षणाचा जो पाया घातला त्यात त्याने आपल्याला गुलाम बनवले आहे. आपल्याला स्वातंत्र्य व स्वराज्याबाबत बोलावे लागते तेही एका परदेशी भाषेमध्ये, ही दुर्दैवी गोष्ट नाही का?
ही गुलाम मानसिकता मुळात शिक्षण व्यवस्थेतून आलेली आहे. जनसंघाचे सरचिटणीस दीनदयाल उपाध्याय यांनी 22 एप्रिल 1965 रोजी केलेल्या एका भाषणात म्हटले होते, आपल्या देशावर 150 वर्षे ब्रिटिशांचे राज्य होते. त्यांच्या शासनकाळात त्यांनी असे अनेक उपाय केले की आपल्यामध्ये स्वतःबद्दल तिरस्कार आणि त्यांच्याबाबत आदर निर्माण झाला. इंग्रज होते तोपर्यंत स्वदेशभक्तीच्या भावनेमुळे आपण इंग्रजीपणा दूर ठेवणे हे गौरवाची बाब समजत होतो. मात्र आता इंग्रज गेल्यानंतर इंग्रजीपणा ही अनुकरणाची गोष्ट बनली आहे. म्हणूनच नोकरशाहीला इंग्रजीत काम करणे, न्यायपालिकेला इंग्रजीत न्याय देणे आणि विचार केंद्रांना इंग्रजीत चर्चा करणे ही श्रेष्ठतेची बाब वाटते. इंग्रजी भाषा ही श्रेष्ठतेची निदर्शक बनली आहे, हे वसाहतवादाचेच लक्षण आहे.
आज जगात फक्‍त ब्रिटन किंवा अमेरिकाच प्रगत नाहीत. फ्रान्स, स्वीडन, चीन आणि जपान यासारख्या देशांनी तंत्रज्ञान, वैद्यक आणि अर्थव्यवस्था यासारख्या इंग्रजीची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांमध्ये भरारी घेतली आहे. मात्र त्यांनी केवळ गरजेपुरता इंग्रजीचा वापर करणे आणि आपले सामाजिक जीवन स्वभाषेत जगणे याच्यामध्ये उत्कृष्ट संतुलन साधले आहे. फक्त भारत आणि तत्सम तिसऱ्या जगातील देश असे आहेत की, त्यांना स्वतःच्या भाषेत व्यवहार करणे कमी प्रतीचे वाटते. तेच इंग्रजीत बोलले की विद्वत्तेचे लक्षण वाटते. प्रसिद्ध समाजवादी नेते राम मनोहर लोहिया म्हणत असत, 40 कोटी हिंदुस्तानी लोकांसाठी तीस लाख लोकांची इंग्रजी ही एखाद्या गुप्त विद्येसारखी आहे, जादूटोणा किंवा भूत घालविण्याच्या मंत्रासारखे आहे.
खरे दुखणे आहे ते येथे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)