नासिकाभूषण नथ

नऊवारीची मक्तेदारी असलेली नथीचं रूपांतर आता नव्या नथीत झालं आहे. पेहराव कोणताही असो, जरा हटके लूक येण्यासाठी आजकाल नथ वापरली जाते. अगदी फॅशन रॅम्पवरही इतरांपेक्षा वरचढ दिसण्यासाठी मॉडेल्सने नथ घातलेली आपण पाहिली आहे. परंपरेला साजेसा असा पेहराव करणं प्रत्येक महिलेला आवडतं.

नथीचा साज तसा फार जुना. नथ घालून मिरवणं तर प्रत्येक कार्यक्रमाची शोभाच असते. त्यामुळे नऊवारी साडीवर नथ नाही घातली तर ती साडीही नथीशिवाय फिकी फिकी वाटते. परंतु आजच्या तरुणींनी या नथीलाच मॉडर्न केलं आहे. पेहराव कोणताही असो नथ घालण्याची पद्धत आपल्याकडे रुजू होत आहे. नथ फक्त साडयांची मक्तेदारी होती. परंतु आता कुर्ता, टॉपवर देखील मुली नथ घालतात. त्यामुळे नथीचं हे नवं फ्यूजन आजकाल प्रत्येकीलाच भावतं आहे.

पूर्वीपासूनच नथीमध्ये अनेक बदल घडत गेले. पेशवेकाळापर्यंत नथ म्हणजे सोन्याचे एक कडे व त्याला अडकवलेले काही मोती असेच या दागिन्याचे स्वरूप होते. पेशवेकाळात जेव्हा महाराष्ट्राचे वैभव वाढले तेव्हा येथील तालेवार लोकांनी या मूळच्या नथीचे रूप बदलून तिला मोती जडवून व रत्ने लावून नथीचे नवे स्वरूप तयार केले. त्याचप्रमाणे आता त्यात बदल घडून आजच्या पेहरावावरही नथ वापरली जाते.

आजकाल अनेक ठिकाणी प्रभातफेऱ्या होतात. या प्रभातफेऱ्यांना सध्या तरुणांईकडून प्रचंड प्रतिसादही मिळतो. अशावेळेस प्रत्येक वेळेला नऊवारी साडया नेसणं शक्‍य नसल्याने पायजमा-कुर्ता घातला जातो. परंतु यातही काही निराळं किंवा हटके दिसण्यासाठी कुर्ता-पायजम्यावरही नथ घालण्याचं नवं फ्यजून येऊ घातलं आहे.

या नव्या फॅशन स्टेटमेंटला तरुणींकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज गुढीपाडवा. अनेक प्रभातफेऱ्या आजच्या दिवशी निघतात. या प्रभात फेऱ्यांमध्ये अनेक ढोल-ताशांची पथके या उत्साहात सहभागी असतात. अशा वेळेस अनेक महिला पथकांचाही सहभाग असतो. साधा पांढरा कुर्ता, त्यावर खाली चुडीदार आणि नाकात नाजूकदार नथ म्हणजे मुलींची नवी नजाकतच जणू.

फक्त एवढयावरच हे फॅशन स्टेटमेंट राहिलं नसून पेज थ्री म्हणून तरुणींत प्रसिद्ध असलेल्या वन-पिसवरही नथीची नजाकत उठून दिसत आहे. पेशवेकाळापासूनच नथीचे अनेक प्रकारही पडत गेले. मोठी असेलेली नथ म्हणजे मराठा पद्धतीची तर ब्राह्मणी पद्धतीची नथ नाजूक असते. याशिवाय नक्षीदार विणकाम केल्यासारखी सरजाची नथही मिळते. महाराष्ट्रीयन स्त्रीचा साज हा नथीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शिवाय आजकाल दाबायची देखील नथ मिळते.

खडयांनी, मोत्यांनी भरलेली नथ म्हणजे तरुणींना भुरळ पाडणारा दागिनाच. त्यामुळे नऊवारीची मक्तेदारी मोडीत काढीत मॉडर्न जमान्यातही नथीने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. नथ हा नासिकाभूषणातील एक महत्त्वाच्या प्रकार असून हिंदू स्त्रियांत तो सौभाग्यलंकार म्हणूनच रूढ झाला आहे. आपल्या सवाशिणीचं लेणं म्हणून मान्यता पावलेली नथ, तिच्या आगळ्या नजाकतीसाठी अजूनही प्रसिद्ध आहे. काही भागात या नथीला मुखरा असंही म्हटलं जातं.

महाराष्ट्रीय मुलीचा साजश्रगांर नथीशिवाय पुरा होत नाही असं म्हणतात. या नथीनं गेल्या वर्षी तर बॉलीवूडच्या अनेक तारकांना वेड लावलं होतं. सोनम कपूर, विद्या बालन तर कान्स इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये चक्क नथ घालून मिरवल्या होत्या. राणी मुखर्जीनेसुद्धा आपल्या चित्रपटाचं प्रमोशन चक्क नथ घालून केलं होतं. बॉलीवुडच कशाला हॉलीवूडमधल्या अनेक तारकांनाही या खास पारंपरिक भारतीय दागिन्याचं कुतुहल वाटतं. गेल्या वर्षीपासून या नथ किंवा नथनीच्या ट्रेंडनं पुन्हा एकदा फॅशनच्या दुनियेत एण्ट्री घेतली आहे. हल्लीच्या काही फॅशन शोंमध्ये तर मॉडेलसुद्धा नथ घालून रॅम्पवॉक करताना दिसतात. त्यामुळे या पारंपारिक नथीला एक वेगळंच रूप आलंय. लग्नासाठी मराठा, पोलकी, ब्राम्हणी, कारवारी, मुघल अशा प्रकारच्या नथ पुन्हा एकदा हिट होत आहेत.

तर पारंपरिक कपडय़ांवर फक्त नथ किंवा चमकी वापरायची अशी कॉलेजिअन्सची मानसिकता ही हळुहळु बदलू लागली आहे. कुर्ता किंवा साध्याशा पंजाबी ड्रेसवर फॅन्सी स्टाईलची नथ किंवा चमकी शोभून दिसते त्यामुळे अनेक कॉलेजिअन्स मुली इतर ऍक्‍सेसरीज बरोबर फॅन्सी नथही विकत घेत आहेत.

सध्या लग्नसराई सुरू होईल त्यामुळे लग्नसराईसाठी ज्या मुली नथीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी पारंपारिक नथनीपेक्षा काही नवे पर्याय दागिन्यांच्या दुकानात आले आहेत. ज्या मुलींना अगदी छोटीशी अन्‌ नाजूक नथ हवी असेल तर त्यांच्यासाठी ब्राम्हणी नथीचा पर्याय एकदम बेस्ट. ही नथ अत्यंत नाजूक असते त्यामुळे ज्यांना असं नाजूक साजूक काहीसं हवं असेल त्यांनी मोत्याच्या ब्राम्हणी नथ पहाव्यात. दुसरी नथ म्हणजे ब्राम्हणी प्रकारची पण यात मोत्या ऐवजी बारीक हिरे असतात. हा नथीचा अगदीच फॅन्सी प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही फॅन्सी साडीवर शोभणारी नथ पहात असाल तर अशी नथ घ्यायला हरकत नाही. मराठा नथ ब्राम्हणी नथीपेक्षा थोडी वेगळी, ही नथ ब्राम्हणी नथीपेक्षा मोठी असते आणि जास्त भरगच्च सुद्धा. तुम्हाला नाजूक नथ नको असेल तर अशा पद्धतीची नथ तुम्ही घेऊ शकता.

कारवारी नथ ही दिसायला अत्यंत आकर्षक दिसते. मोत्यांचं अर्धवर्तुळ आकारातलं कडं आणि त्या वर्तुळाच्या आतून सोन्यांच्या तारांची नाजूक नक्षी असं साधारण या कारवारी नथीचं रुप असतं. ही नथ चांगलीच भरलेली असते. त्यामुळे ज्यांना नाजूकपेक्षा लक्ष वेधून घेण्यासाठी नथ घालायची असेल त्यांनी कारवारी नथ निवडावी. पण ही नथ सगळ्यांनाच शोभून दिसते असं नाही. त्यामुळे घेताना चेह-याची ठेवण ही लक्षात घ्यावी.

काही ज्वेलर्सनी ज्या नववधू जास्तच मॉर्डन आहेत आणि ज्यांना अँटिक दागिने घालायला आवडतात अशांसाठी मुघल किंवा पोलकी कलेक्‍शन आणलं आहे. या प्रकारातल्या नथ या महाराष्ट्रीय नथपेक्षा अगदीच वेगळ्या असतात. या नथी तुम्हाला अँटिक दागिन्यांच्या दुकानात मिळतील. तुलनेनं या नथी जास्त महाग असतील पण एक मात्र नक्की, या अशा नथ तुम्हाला फार क्वचितच मुलींकडे सापडतील. त्यामुळे ज्या नववधुंना हटके दागिने हवे असतील त्यांनी अशा नथ बघाव्यात. ही यादी झाली नववधुसाठी पण कॉलेजला जाणा-या तरूणींसाठीही नथ, चमकी किंवा इंग्लिशमध्ये सांगायचं तर नोज रिंग्जआहेत. यात थोडा पारंपरिक आणि थोडा फॅन्सी लुकही पहायला मिळतो. सोनं आणि रंगीत स्टोन यांच्या नाजूक नथनी ड्रेस किंवा कुर्त्यांवर शोभून दिसतात. ऍक्‍सेसरीच्या दुकानात या नोज रिंग म्हणजे नथनी मिळतात. तुम्ही कुर्त्यांच्या रंगाला मॅंचिग अशा स्टोनची नथनी निवडू शकता आणि महत्वाचं म्हणजे या नथनीसाठी तुम्हाला नाक टोचण्याची गरज नाही.

– श्रुती कुलकर्णी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)