उत्तर सोलापूर, बार्शी तालुक्‍याची दुष्काळाची माहिती मागविली

सोलापूर – खरीप हंगामातील दुष्काळी यादीतून वगळलेल्या जिल्ह्यातील उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्‍यातील रब्बी हंगामातील दुष्काळाबाबतची माहिती शासनाने तातडीने मागविली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने उत्तर सोलापूर व बार्शीच्या तहसीलदारांना अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे. या दोन्ही तालुक्‍यात रब्बी हंगामासाठी ट्रीगर 2 लागू झाल्याने दुष्काळ जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यंदा सरासरीच्या केवळ 38 टक्के इतकाच पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्‍यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शासनाने दुष्काळी यादीतून हे दोन्ही तालुके वगळले होते. परंतु जसजसा उन्हाळा येईल तसतशी दुष्काळाची दाहकता या दोन्ही तालुक्‍यातही वाढत गेली. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाकडून संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून रब्बी हंगामातील दुष्काळासाठी मुल्यांकन करण्यात आले.

फेब्रुवारीअखेर उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्‍यातही ट्रीगर 2 लागू झाला आहे. याअनुषंगाने आता दोन्ही तालुक्‍यातील एकूण गावापैकी दहा टक्के गावे रॅन्डम पध्दतीने निवडून सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणाचा अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठविण्याबाबतही कळविण्यात आले आहे. रब्बी हंगामातील दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम तारीख 31 मार्च असल्याने याबाबतचा अहवाल तातडीने पाठवून देण्याच्या सूचना शासनाच्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)