शांतता फलकांपुरतीच उरणार

क्षेत्रांची निश्‍चिती : 2,047 पैकी उरले फक्‍त 121 “झोन’

पुणे – वाढती वाहने, वाहतूक कोंडी आणि सण-उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषण वाढते. हे प्रमाण मानकांपेक्षा अधिक आहे. असे चित्र असतानाच, राज्यशासनाने शहरातील शांतता क्षेत्राची संख्या 2 हजार 47 वरून थेट 121 वर आणली आहे. ही क्षेत्र निश्‍चित केल्याचे आदेश महापालिकेस नुकतेच प्राप्त झाले आहेत. त्यामुळे ही शांतता आता फलकापुरतीच उरणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शांतता क्षेत्राचे फलक महापालिकेकडून नव्याने लावले जाणार आहेत. यामध्ये प्रमुख रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालय परिसरात ही ठिकाणे यांचा समावेश आहे. शांतता क्षेत्र निश्‍चित करण्याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 10 ऑगस्ट 2017 रोजी सुधारित नियमावली तयार केली आहे. याबाबत राज्य सरकारच्या नगरविकास आणि ग्रामविकास खात्याला सूचना दिल्या आहेत. यानुसार रुग्णालये आणि शिक्षण संस्थांजवळचा 100 मीटरपर्यंतचा परिसर हा शांतता क्षेत्र असेल, असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्याचबरोबर अन्य ठिकाणी शांतता क्षेत्र प्रस्थापित करण्याचे राज्य शासनाला अधिकार असणार आहेत. त्यानुसार, राज्य शासनाने नोव्हेंबर-2017 मध्ये महापालिकेस पत्र पाठवून नव्याने शांतता क्षेत्र निवडून त्यांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यात फक्त शाळा, न्यायालय परिसर आणि रुग्णालयांच्या परिसराबाबत आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, पालिकेच्या पर्यावरण विभागाने शासनाच्या निकषांनुसार, ही शांतता क्षेत्राची यादी तयार केली होती. ही यादी महापालिकेने मे-2018 मध्ये राज्यशासनास सादर केली होती. त्यानुसार, शासनाने या अंतिम केलेल्या क्षेत्राचा आदेश महापालिकेस नुकताच पाठविला असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख मंगेश दिघे यांनी दिली.

ध्वनी प्रदूषण वाढण्याची भीती
शांतता क्षेत्रांबाबत राज्यशासनाने निर्णय घेतल्याने शहरातील शांतता क्षेत्रांची संख्या आता मर्यादीतच असेल. त्यामुळे इतर क्षेत्रात किमान फलक पाहून ध्वनीप्रदूषण रोखले जात होते. मात्र, आता त्यावर कोणतेही नियंत्रण राहणार नसल्याची स्थिती आहे. प्रशासनाने फक्‍त मुख्य रस्त्यावरील रुग्णालये, न्यायालये तसेच शाळा आणि महाविद्यालयांचा यात समावेश केला असून आतील बाजूच्या शाळा, महाविद्यालये, रुग्णालये या परिसरात हा नियम लागू राहणार नाही. त्यांना सर्व ध्वनींच्या त्रासाचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, महापालिकेकडून आणखी काही शांतता क्षेत्र प्रस्तावित करण्यात येणार आहेत. मात्र, शासनाकडून पुन्हा आदेश आल्यानंतरच त्याची माहिती शासनाला पाठविता येणार आहे.

काय आहेत ध्वनी प्रदूषणाची मानके
– निवासी भागात दिवसा 55 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको.
– व्यावसायिक क्षेत्रात दिवसा 60 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको.

प्रदूषणाची मर्यादा ओलांडलेली
शहराच्या सर्व भागात वाहनांच्या आवाजाची मर्यादा ही तब्बल 65 डेसिबलच्या वर आहे. तर उत्सवांच्या कालावधीत ही मर्यादा 75 डेसिबलपेक्षाही जास्त असते. त्यामुळे शहरातील सध्याची ध्वनी प्रदूषणाची आकडेवारी पाहता शांतता क्षेत्र घोषित केल्यानंतरही केवळ फलकांपुरतीच मर्यादीत असल्याचे वास्तव आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)