मनसेला महाआघाडीत “नो एण्ट्री’ ; कॉंगेसचा विरोध

मुंबई:  मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसेला महाआघाडीमध्ये सामावून घेण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रस्ताव कॉंग्रेसने फेटाळला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विचारधारा वेगळी असल्याने त्यांचा समावेश महाआघाडीत करण्यास कॉंगेसचा विरोध असल्याचे कॉंगेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मनसेला महाआघाडीत घ्यावे असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी ठेवला होता. तत्पूर्वी अजित पवार यांनी राज ठाकरे यांची भेटही घेतली होती. पण कॉंग्रेसचे मनसेबरोबर वैचारिक मतभेद आहेत. भाजप विरोधात लढताना धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून देशपातळीवर कॉंग्रेस समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करत आहे. समविचारी पक्षांचीच महाआघाडी असावी, असा उद्देश आहे. त्यामुळे मनसेला आघाडीत घेण्याचा आग्रह धरू नये, असे स्पष्टपणे कॉंग्रेसने राष्ट्रवादीला कळवले असल्याचे त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपाला होऊ नये अशी कॉंगेसची भूमिका आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीने महाआघाडीत सामील होण्याबाबत चर्चा झाली असून त्यांना काय देता येईल याचा प्रस्ताव सुद्धा देण्यात आला आहे. आता त्यांनी निर्णय करायचा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

राहुल यांच्या सभेला शिवाजी पार्क नाकारले

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची 1 मार्चला मुंबईत सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून कॉंग्रेसने अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळला असल्याने आता एमएमआरडीए मैदानावर सभा होणार आहे. शिवसेना, मनसे, भाजप, वंचित बहुजन आघाडीला मैदान मिळते, पण राहुल गांधीना सरकार जाणीवपूर्वक परवानगी देत नाही नसल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. लोकशाही व्यवस्थेत सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)