नवी दिल्ली: पंतप्रधान म्हणून देशाला नरेंद्र मोदींची आवश्यकता आहे. ही काळाची गरज असल्याने त्यांना निवडून देण्याचं आवाहन देशातील ९०० पेक्षा जास्ती कलाकारांनी केलं आहे. यामध्ये गायक शंकर महादेवन, गायिका अनुराधा पौडवाल आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यासह अनेक प्रख्यात कलाकारांचा समावेश आहे. या सर्व कलाकारांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये दहशतवादासारखी आव्हानं देशासमोर असताना ‘मजबूर’ नव्हे, तर ‘मजबूत’ सरकार आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.
विशेष म्हणजे, आठवड्याभरापूर्वीच ६०० हून अधिक कलाकारांनी भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांना सत्तेतून खाली खेचण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये अमोल पालेकर, नसिरीद्दुन शहा, गिरीश कर्नाड यासारख्या मंडळींचा समावेश होता.