महापौर टिळक यांच्याकडून पुढाकार : नैसर्गिक जलस्त्रोतांचे होणार संवर्धन
टेकडीवर होणार “सीसीटी’
शहरातील टेकड्यांचाही जलसंधारणासाठी वापर करण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. त्यासाठी टेकड्यांवर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरावे म्हणून सीसीटी (चर) घेण्यात येणार असून त्यात नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
पुणे – वाढत्या शहरीकरणामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा मर्यादीत होत आहे. ही बाब लक्षात घेता भविष्यातील शहराची तहान भागविण्यासाठी नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन आणि भूजल पातळी वाढविणे अत्यावश्यक असून त्या अनुषंगाने महापौर मुक्ता टिळक यांच्या पुढाकाराने महापालिकेकडून “जलयुक्त शहर’ अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून “मिशन ग्राऊंड वॉटर’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात, नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर टिळक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापौर म्हणाल्या, गेल्या काही वर्षांत वाढत्या कॉंक्रिटीकरणामुळे शहरातील पाण्याची पातळी खालवलेली आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरात जास्तीत जास्त रेनवॉटर हार्वेस्टिंग व्हावे यासाठी उपाययोजन हाती घेण्यात येणार आहेत. त्यात सिमेंट रस्ते, महापालिकेच्या तसेच शासकीय इमारतीमध्ये ही यंत्रणा बसविली जाणार आहे. तसेच, नागरिकांना त्यासाठी काही अनुदान देणे शक्य असल्यास त्यासाठीही विचार विनिमय करण्यात येत आहे.
या शिवाय, शहरात तसेच शहराच्या आसपास नैसर्गिक जलस्त्रोत असून त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. त्याचा वापर होत नाही. या स्त्रोतांचे संवर्धन करून तो कशाप्रकारे वापरता येईल यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र समित्या करण्यात आल्या असून एक समितीत या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेचे संबंधित विभाग प्रमुख असणार असून दुसऱ्या समितीत शहरातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, जलतज्ज्ञ यांचा समावेश असणार असून ही समिती जलसंधारणाच्या उपाययोजना सुचविणार आहे. या उपक्रमासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात 2 कोटींची तरतूद असून त्या माध्यमातून हे काम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.