वाराणसी – कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील नेते संजय निरुपम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून “औरंगजेब’ अशी उपमा दिली. त्यामुळे एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे.
वाराणसीमध्ये मोदींच्या विरोधातील सभेदरम्यान त्यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले. “या मतदारसंघातील लोकांनी अशा व्यक्तीला निवडले आहे, जो औरंगजेबाचे आधुनिक अवतार आहे. कारण वाराणसीमध्ये शेकडो मंदिरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच सूचनेमुळे पाडली गेली आहेत.’ असे निरुपम म्हणाले.
पंतप्रधानांच्याच सूचनेवरून विश्वनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांन 550 रुपयांचे शुल्क आकारण्यात येत आहे. त्यावरूनच जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले आहे, ते औरंगजेबही करू शकला नाही, असे सिद्ध होते. मोदी नेहमी हिंदूंच्या हक्कांबाबत बोलत असतात. पण आता त्यांनीच मंदिरे पाडली आहेत आणि भाविकांवर “झिझिया’ करही लावला आहे. हे कृत्य आधुनिककाळातील औरंगजेबाचेच आहे, असे निरुपम म्हणाले.