निळवंडेचे कालवे जमिनीवरूनच

File photo

गडकरी यांचे स्पष्टीकरण; खा. लोखंडे यांच्या प्रश्‍नाला उत्तर

रांजणगाव देशमुख – लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे कालव्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अकोले तालुक्‍यातील निळवंडेचे कालवे हे बंदिस्त नसून ते पारंपरिक पद्धतीने जमिनीवरूनच होणार असल्याचे स्पष्ट केले. या ठिकाणी भूसंपादन झाले आहे. त्यामुळे कालवे भूमिगत करण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निळवंडे धरणाचे भूमिपूजन होऊन 47 वर्षे झाली आहेत. प्रकल्पाची मूळ किंमत फक्त साडेसात कोटी रुपये होती. आता ती 2232 कोटी रुपये झाली आहे. अजूनही निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना पुरेशी गती नाही. लाभक्षेत्र पाण्यापासून वंचित आहे. कालवे पारंपरिक की भूमिगत याबाबत अकोले तालुक्‍यात संभ्रम निर्माण केला जात आहे. साईबाबा समाधी शताब्दी वर्षात दुष्काळी भागाला पाणी मिळणार का, तसेच निळवंडे लाभक्षेत्राला “अच्छे दिन’ येणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

खा. लोखंडे यांनी याबाबत लोकसभेत चर्चा घडवून आणली. त्यावर उत्तर देताना गडकरी म्हणाले, की महाराष्ट्र शासनाने जमीन संपादित केलेली आहे. कालव्याच्या जागेचे उतारे शासनाच्या नावे आहेत. त्यामुळे कालवे पाईपलाईनने करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जिथे भूसंपादन झाले आहे, तिथे तात्काळ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर साईबाबांच्या भूमीत पाणी गेले, तर मलाही आशिर्वाद मिळतील. बळीराजा कृषी संजीवनी योजनेत ऊर्ध्व प्रवरा 2 (निळवंडे) प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे; मात्र केंद्रीय जल आयोगाची मान्यता नुकतीच मिळाली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे वित्तीय गुंतवणूक प्रमाणपत्र मिळण्यास उशिर झाला. राज्याचे पत्र मिळताच निळवंडेचा तत्काळ विशेष प्रकल्पात समावेश करून प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.

या प्रश्नाबाबत खा. लोखंडे यांची तळमळ जास्त आहे. त्यामुळे त्यांचे समाधान झाले पाहिजे, असे लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. गडकरी यांनीही हे मान्य करत लोखंडे यांच्या प्रश्नावर सविस्तर उत्तर दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)