‘निघोज नागरी’चे कार्य राज्याला दिशादर्शक

माजी आमदार पोपटराव गावडे : संस्थेच्या तेराव्या शाखेचे टाकळी हाजी येथे उद्‌घाटन

निघोज  – ग्रामीण भागातील जनतेला सावकारी पाशातुन मुक्‍त करण्यासाठी स्थापन केलेल्या निघोज नागरी पतसंस्थेने माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात सभासदांचा विश्‍वास संपादन करीत यशाची नवनवीन शिखरे गाठली आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या विश्‍वासाच्या जोरावर या संस्थेने मोठा नावलौकिक कमविला आहे. निघोज नागरी पतसंस्थेचे कार्य राज्याला दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्‌गार शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी काढले.

निघोज नागरी पतसंस्थेच्या तेराव्या शाखेचे उद्‌घाटन टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नामदेव थोरात, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे, सरपंच दामूशेठ घोडे, दिलीप सोदक, सेवा सोसायटीचे अध्यक्ष बन्सी घोडे, संस्थेचे संचालक वसंत कवाद, माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, बाळासाहेब लामखडे, भिवाजी रसाळ, बहीरू कळसकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, उप व्यवस्थापक सुभाष साठे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

गावडे म्हणाले, निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे मार्गदर्शक बाबासाहेब कवाद व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी लावलेले छोट्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले. यामागे सभासद, हितचिंतक, ठेविदार व कर्जदार यांनी संचालक मंडळावर टाकलेला विश्‍वास कारणीभूत ठरला. काळाची पावले ओळखत माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकतेची कास धरली आहे.

संचालक वसंत कवाद यांनी संस्थेच्या आर्थिक स्थिती विषयी सांगितले की, सभासद संख्या 15 हजार 775, भागभांडवल- 2 कोटी 91 लाख, ठेवी-99 कोटी 91 लाख, कर्जवाटप- 62 कोटी 1 लाख, गुंतवणूक- 53 कोटी 99 लाख, थकबाकी- 5.65 टक्‍के, कर्जवसुली- 94.35 टक्के, नेट एनपीए – 4.27 टक्‍के, एकूण शाखा-13 आहेत. या वेळी उपाध्यक्ष नामदेव थोरात व संचालक वसंत कवाद यांच्या हस्ते पाहुण्यांचा गौरव करण्यात आला. मुख्य व्यवस्थापक दत्तात्रय लंके यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)