निघोजच्या मळगंगा देवी मंदिरात चोरी

निघोज (ता. पारनेर) : येथील मळगंगा देवी मंदिरात चोरी झाल्याची माहिती कळताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

दोन दानपेट्या फोडल्या : साडेचार लाखांचा ऐवज लंपास; पुजाऱ्याच्या घराला लावली कडी

निघोज – पारनेर तालुक्‍यातील निघोज येथील मळगंगा देवी मंदिरात मध्यरात्री दोन दानपेट्या फोडून, सोने, चांदीचे दागिने अशा एकूण चार लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. देवीचे मंदिर मुख्यपेठेत असून हाकेच्या अंतरावर पोलीस दूरक्षेत्र आहे. मंदिराचे पुजारी सुनील गायखे पहाटे 3.30 ते 4 वाजता देवीची पूजा करण्यासाठी मंदिरात निघण्याच्या तयारीत होते. मात्र त्यांच्या घराच्या कड्या बाहेरून लावलेल्या होत्या. मात्र खिडकीतून ते बाहेर आले. त्यावेळी त्यांना मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला.

जवळच असणाऱ्या पोलीस दूरक्षेत्रमध्ये जाऊन त्यांनी चोरीची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मंदिराजवळ येऊन चोरीची माहिती घेऊन वरिष्ठांना कळविले. विषेश म्हणजे या दोन्ही दानपेट्या चारशे मीटर अंतरावरील कपीलेश्‍वर मंदिराजवळ आढळल्या. दोन्ही दानपेट्यांमध्ये साधारण पन्नास ते साठ हजार रूपये असल्याची माहिती मळगंगा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

अशा प्रकारे पाच लाख रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केली. मंदिरात मळगंगा ट्रस्टने सुरक्षितता म्हणून सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून कॅमेरे सुरू मात्र रेकॉर्डिंग बंद अशी अवस्था आहे. त्यामुळे सीसीटीव्ही असूनही त्याचा फारसा उपयोगच होणार नसल्योच स्पष्ट झाले. मळगंगा देवी मंदिर भरबाजारपेठेत आहे. या मंदिराला तीन लाकडी असे मजबूत दरवाजे आहेत. एक दरवाजा गाभाऱ्याच्या समोर आहे.

एक मुख्य पेठेकडून तर तिसरा दरवाजा पुजारी गायखे बंधूंची घरे आहेत तिकडून आहे. पुजाऱ्याच्या बाजूच्या दरवाजातून चोरटे भक्‍कम कुलूप तोडून मंदिरात आले. त्यावेळी त्यांनी पुजाऱ्याच्या घराला बाहेरून कड्या लावल्या. तीनपैकी एक दानपेटी मोठी असल्याने त्यांना ती उचलता आली नाही. मंदिराच्या गाभाऱ्याचे कूलूप तोडून त्यांनी अडीच तोळे सोन्याचे व बारा किलो चांदीचे दागिने चोरले. गाभाऱ्यातून बाहेर मंदिरात आल्यानंतर त्यांनी दोन दानपेट्या ताब्यात घेऊन ज्या दरवाजातून ते बाहेर आले तो आतून बंद केला. मुख्यपेठेकडील दरवाजातून ते बाहेर पडले. त्यांनी या दानपेट्या दशक्रिया विधी घाटाजवळ असणाऱ्या मंदिराजवळ नेल्या. त्यांनी दगडांच्या सहायाने दानपेट्या फोडल्या. आतील रक्‍कम घेऊन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. दानपेट्या चारशे मीटर अंतरावर कोणत्या वाहनातून नेल्या याचा शोध पोलीस घेत आहेत. साधारण पाच ते सहा चोरट्यांनी हा चोरीचा प्रकार केला असावा असा अंदाज आहे. याचा पोलीस कशाप्रकारे शोध घेतात याकडे जनतेचे लक्ष वेधले गेले आहे.

ग्रामस्थांचा संताप.. गाव बंद ठेऊन निषेध

गेल्या पंधरा वर्षापासून दान स्वरुपात सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्‍कम मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. आजही मळगंगा देवीचे पंचवीस लाख रुपयांचे दागिने मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने बॅंक व पतसंस्थेच्या लॉकरमध्ये सुरक्षीत ठेवले आहेत. मात्र तब्बल पाच लाख रुपयांच्या ऐवज सोन्याचांदीच्या दागिन्यांची व दानपेटीतील रकमेची चोरी झाली. त्यामुळे ग्रामस्थ, भाविकांनी संताप व्यक्‍त केला. घटनेचा निषेध म्हणून गाव बंद ठेवण्यात आले आहे. पहाटे पाच ते दुपारी एक वाजेपर्यंत पोलीस दूरक्षेत्र व मळगंगा मंदिर परिसरात लोकांनी गर्दी केली होती.

शिरसुले गावापर्यंत माग…

पारनेरचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी घटनास्थळी सकाळी नऊ वाजता भेट देऊन माहिती घेतली. तसेच याबाबत स्थानिक पोलिसांना मार्गदर्शन केले. नगर येथून श्‍वानपथक आणण्यात आले होते. त्याने कपिलेश्‍वर मंदिरापासून शिरसुले गावापर्यंत माग दाखवला. या चोरीच्या घटनेचा निषेध होत आहे. चोरीचा तपास न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थ, भाविकांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)