सलामीच्या लढतीत 10 विकेटस्ने एकतर्फी विजय
कार्डिफ – न्यूझीलंड संघाने 2019 विश्वचषकाची सुरुवात मोठ्या दिमाखात केली आहे. सलामीच्या सामन्यात श्रीलंकेवर 10 गडी राखून मात करत किवीने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेला 136 धावांवर गारद केल्यानंतर न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 137 धावांचे आव्हान सहज पूर्ण केले. सलामीवीर मार्टीन गुप्टील आणि कॉलिन मुनरोने अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मार्टीन गप्टीलने नाबाद 73 तर मुनरोने नाबाद 58 धावा केल्या. श्रीलंकेचा एकही गोलंदाज न्यूझीलंडची सलामीची जोडी फोडू शकला नाही.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव 29.2 षटकांत 136 धावांवरच गुंडाळला. कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने सर्वाधिक नाबाद 52 धावा केल्या. तर कुशल परेरा (27) आणि थिसिरा परेरा (27) यांनी थोडेफार योगदान दिले. लंकेच्या सात खेळाडूंना दुहेरी आकडाही पार करता आला नाही.
तत्पूर्वी, न्यूझिलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेल्या लंकेला पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर झटका बसला. मॅट हेन्रीने लहिरु थिरिमानेला पायचित बाद केले. दिमुथ करुणारत्ने आणि कुसल परेरा यांनी सावध खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु आठव्या षटकांत हेन्रीने लागोपाठ दोन बळी घेत लंकेचे कंबरडे मोडले. हेन्रीने षटकातील पहिल्याच चेंडूवर कुसल परेराला (29) ग्रॅंडहोमकरवी झेलबाद केले. त्यानंतर पुढील चेंडूवर कुसल मेंडिसला (0) बाद करत पेव्हिलियनचा रस्ता दाखविला.
मेंडिस माघारी परतल्यानंतर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. मधल्या फळीतला एकही फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत असताना, कर्णधार दिमुथ करुणरत्नेने एक बाजू लावून धरली होती. अखेरच्या फळीत थिसारा पेरेराला साथीला घेत करुणरत्नेने 52 धावांची भागिदारी करत आपले अर्धशतक साजरे केले.
या भागीदारीमुळे श्रीलंकेने धावफलकावर 100चा आकडा गाठला. मात्र थिसारा पेरेरा माघारी परतल्यानंतर श्रीलंकेच्या शेपटाला झटपट गुंडाळत न्यूझीलंडने 136 धावात लंकेच्या संघाला बाद केले. कर्णधार करुणरत्ने 86 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 52 धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले. ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी. ग्रॅंडहोम, जेम्स निशम, मिचेल सॅंटनर यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेत त्यांना सुरेख साथ दिली.
संक्षिप्त धावफलक :
श्रीलंका 29.2 षटकात सर्वबाद 136 (लहिरु थिरिमाने 4, दिमुथ करुणारत्ने नाबाद 52, कुसल परेरा 29, कुसल मेंडिस 0, थिसारा पेरेरा 27. मॅट हेन्री 29-3, लॉकी फर्ग्युसन 22-3).
न्यूझीलंड ः 16.1 षटकात 137 (मार्टीन गुप्टील नाबाद 73, कॉलिन मुन्रो नाबाद 58. लसिथ मलिंगा 46-0, सुरंगा लकमल 28-0, जीवन मेंडिस 11-0).