हॅमिल्टन – भारतीय महिला संघाने न्यूझीलंड विरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर टी-20 मालिकेत भारतीय संघाला 3-0 अशा मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर संपूर्ण मालिकेत आपल्या उत्कृष्ट कामगिरी करताना भारतीय संघाचा डाव एकाकी सावरणाऱ्या स्मृती मंधनाने संघातील इतर फलंदाजांवर टीका केली असून संपूर्ण 20 षटके फलंदाजी करून संघाला विजय मिळवून देणाऱ्या फलंदाजाची संघाला गरज असल्याचे प्रतिपादन तिने केले आहे.
भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे गमावले होते. स्मृतीने टी-20 मालिकेत तीन सामन्यांमध्ये 60 च्या सरासरीने 180 धावा बनवल्या असून मालिकेतील सर्वात जास्त धावा करणारी ती खेळाडू असूनही भारतीय संघाला मालिकेत एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला होता.
मालिकेतील पहिल्या सामन्यात 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारताला स्मृती आणि जेमिमाने चांगली सुरुवात करून दिली होती. दोघींनी संघाला शतकी मजल मारून दिली होती. 103 धावांवर तीन गडी बाद झाल्यानंतर भारतीय संघातील इतर फलंदाज केवळ 33 धावांमध्येच परतले होते. तर, दुसऱ्या सामन्यातही स्मृती आणि जेमिमाने चांगली खेळी केल्यानंतर मधल्या फळीने निराशा केली.
पहिल्या दोन्ही सामन्यांप्रमाणे तिसऱ्या सामन्यातही स्मृतीने धडाकेबाज खेळी करत 52 चेंडूत 86 धावांची खेळी साकारत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. मात्र, त्यानंतर इतर फलंदाजांना आवश्यक धावगती राखता न आल्याने भारताने हा सामना केवळ 2 धावांनी गमावत मालिकेत एकतर्फी पराभव स्वीकारला.
त्यामुळे सामन्यानंतर बोलताना स्मृती फलंदाजांवर नाराजी व्यक्त करत मधल्या फळीत चांगल्या खेळाडूंची संघाला गरज असून केवळ एक किंवा दोन खेळाडू संघाला विजय मिळवून देऊ शकत नाहीत. मधल्या फळीत अखेरपर्यंत फलंदाजी करून संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूची खूप गरज असल्याचे मंधनाने यावेळी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा